Breaking News

टीम इंडियाला दुखापतींचे ग्रहण

जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त; चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्याने अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वीच बुमराहला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे.

रिपोर्ट्सनुसार तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचे स्कॅन करण्यात आले. यामध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत नाही. भारतात होणार्‍या आगामी इंग्लंड दौर्‍याचा विचार करून चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहला आराम देण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षण करीत असताना एबडॉमिनल स्ट्रेन झाले होते. त्यामुळे तो आता ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही, पण मायदेशात इंग्लंडविरोधात होणार्‍या कसोटी मालिकेसाठी बुमराह उपलब्ध असणार आहे.

याआधीच मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल यांनाही कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यात भर म्हणून तिसर्‍या कसोटी सामन्यात तीन खेळाडूंना दुखापत झाली आहे. पंतची दुखापत गंभीर नसल्याचे समजते.

नटराजन, ठाकूरला संधी मिळणार?

बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. त्यासोबत नवदीप सैनीही असणार आहे. बुमराहच्या जागी नटराजनला संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रवींद्र जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरला अंतिम 11मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे, मात्र संघ व्यवस्थापन ब्रिस्बेन येथे दोन फिरकी गोलंदाजांनिशी मैदानात उतरला, तर कुलदीप यादवला संधी मिळू शकते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply