
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीकेसी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020 – 21 अंतर्गत; ‘लाँ अॅाट युवर डोअर स्टेप’ या 28 जुलै ते 1 ऑगस्ट अशा सलग पाच दिवसांच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्हांडी आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने हे वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारचे आयोजन भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या ‘झुम मिटींग’ या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.
वेबीनारचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्हाडी यांनी केले. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी केले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या, विधी शाखेतील सहा. प्रा. डॉ. संजय जाधव यांनी ‘आर्बिट्रेशन आणि मेडीएशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शर्मिला घुगे यांचे ‘आर्टीकल – 21 कॉन्स्टीट्यूशन ऑफ इंडीया – ग्लिम्प्स अॅट लँडमार्क जजमेंट्स’ या विषयावर, मुंबई उच्च न्यायालयाचे अति. सरकारी वकील अॅड. श्रीकांत गावंड यांचे ‘कन्फेशन ऑफ अॅक्युज्ड इन क्रिमिनल लॉ’ या विषयावर, अति. सरकारी वकील अॅड. विरा गायकवाड यांचे ‘ड्राफ्टींग ऑफ प्लिडींग अँड कॉन्व्हेयन्स’ या विषयावर तर शेवटी वकील अॅड. निरंजन मुंदरगी यांनी ‘रिलेव्हन्सी ऑफ फॅक्टस’ या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. या प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रत्येक व्यक्त्याने प्रश्न-उत्तरे सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. ‘लाँ अॅयट युवर डोअर स्टेप’ या मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची सर्वात प्रथम निवड केल्याबद्दल प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी डॉ. राजेश्री वर्होडी यांचे तसेच वेबीनारमध्ये मार्गदर्शन करणारे सर्व व्याख्याते आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांचे विशेष आभार मानले.
त्यानंतर मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्हाडी यांनी या पाच दिवसांच्या वेबीनारच्या समारोपाचे भाषण देताना भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचे वेबीनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी होणार्या विविध कार्यक्रमांत भाग घेण्याचा सल्ला दिला. पाच दिवस चाललेल्या या वेबिनारमध्ये भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहा. प्रा. श्रुती पोटे, प्रा. आष्का शुक्ला तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुयश बारटक्के, अक्षता ठाकूर, संचिता करडक, संचिता चिमणे आणि फैजान शेख यांनी संयोजनाची जवाबदारी पार पाडली.
या वेबिनार मालिकेतील प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. या वेबिनार मध्ये सहभागी होणार्यास, प्रत्येक दिवशीच्या उपस्थितीबाबत सहभागाचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले.