Breaking News

पूनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याची गरज

महाड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व दरडग्रस्तांना तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचे पुनर्वसनकामी तब्बल 48 सरकारी परिपत्रकांमध्ये बदल केल्याने अभ्यासपूर्ण प्रयत्न यशस्वी झाले. याचे कौतुक दरडग्रस्तांना घरकुलांचा ताबा देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी यशस्वीरित्या समाजसेवी संस्थांच्या मदतीने राबविलेल्या ’देशास आदर्शवत् पुनर्वसनाचा महाड पॅटर्न’असे संबोधिले, मात्र पोलादपूर तालुक्यातील कोंढवी व कोतवाल येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न कुचकामी ठरल्याने हे कौतुकाचे बोल दूषणांमध्ये बदलले आहे.
पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दीविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे, मात्र तेथे दरडग्रस्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापूर्वीच या संकुलांचा जिर्णोध्दार करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे पोलादपूर तालुका सिध्दीविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पुनर्वसनास वंचित राहिला आहे, मात्र सध्या या जिर्णावस्थेत असलेल्या दोन्ही पुनर्वसन संकुलांच्या इमारत सरकार आणि आपद्ग्रस्तांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक म्हणून उभ्या आहेत. 25 व 26 जुलै 2005 रोजी या दोन्ही गावांमध्ये भूस्खलनामुळे दरडग्रस्त झालेल्यांसाठीच्या पुनर्वसन संकुलात न राहता दरडप्रवण क्षेत्रातच अद्याप दरडग्रस्त राहात आहेत. त्यामुळे 2021 वर्षी देवळे ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुतारवाडीतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन संकुलांचे पुढे काय होणार, याची केवळ भाकितं करणेच योग्य ठरणार आहे. साखर सुतारवाडी येथील पुर्णत: 12 घरे आणि अंशत: 10 घरे बाधित असताना एकूण 38 घरे आणि 44 कुटूंबे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. देवळे ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील केवनाळे येथे पूर्णत: 7 आणि अंशत: 10 घरे बाधित झाली असताना 114 केवनाळे, 35 आंबेमाची आणि 14 बौध्दवाडी या एकूण 128 घरांचे पुनर्वसन करण्याकामी सक्तीने भुसंपादन करण्याचा प्रस्ताव करण्यात आल्याने याच गावातील काहींच्या जमिनींवर सरकारी आदेशाची विज कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, मात्र गोडी अपूर्णतेची तब्बल दोन वर्षांनंतरही कायम असून सरकारी अधिकारी केवळ आदेश आणि प्रस्ताव करण्याच्या खेळात बदली होऊन गेल्यानंतर चुकीचे आदेश पारित करून घेणार्‍या आणि हेतुपुरस्सर कोसळलेल्या एका छप्पराचे अ,ब,क,ड असे ऍसेसमेंटचे उतारे करणार्‍या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमुळे आणि एका इमारतीची चार घरे असा पंचनामे करून मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभूल करणार्‍या तलाठयामुळे पुनर्वसनाचे काम रखडणार हे निश्चित झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील 2005 मध्ये पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील नऊ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात 3, देवपूर येथे 4, पार्ले येथे 3, माटवण येथे 5, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे 3, सडवली येथे 6, लोहारमाळ येथे 4, रानबाजिरे येथे 23, आड येथे 2, सवाद येथे 1 आणि हावरे येथे 6 अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला.
पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 असताना येथे 45 लाख रूपये खर्चातून केवळ 15 घरकुलं उभारण्यात आली. कोतवाल खुर्द येथे 10 डिसेंबर 2007 रोजी तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 21 हजार 434 रूपये असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के अधिक वाढल्यामुळे 10 लाख 64 हजार 81 रूपये खर्चातील अधिक वाढहोणार आहे. त्यानुसार कोतवाल खुर्द येथील एका घरकुलासाठी 3 लाख 45 हजार 790 रूपये 75 पैसे खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. कोंढवी येथे 78 कुटूंबे दरडग्रस्त असताना याठिकाणी प्रत्येकी 50 लाख रूपये खर्चातून केवळ 15 घरकुलं उभारण्यात आली. कोंढवीमध्ये केवळ 29 पात्र दरडग्रस्त असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोंढवी येथे तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 49 हजार 651 रूपये एवढी असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के अधिक वाढल्यामुळे कोंढवीतील एका घरकुलासाठी 3 लाख 20 हजार 875 रूपये 95 पैसे खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रूपयांच्या निधीमधून बांधण्यात आलेली ही 30 घरकुले कोतवाल खुर्द व कोंढवी येथे बांधण्यात आल्यानंतर कोंढवी येथील घरकुलांच्या वाटपाची सोडत काढण्यासाठी 25 फेबु्रवारी 2011 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये वाटप झालेल्या 15 दरडग्रस्त लाभाथाअपैकी गंगाराम काळू यादव उर्फ धोत्रे हाच एकमेव येथे वास्तव्यास आहे.
साखर सुतारवाडी येथे 6 तर केवनाळे येथे 5 जणांचे बळी दरडीखाली गेले. यापैकी केवनाळे गावाचा जिऑलॉजिकल सर्व्हे अहवाल वर्ग 1 मध्ये आला आहे. जिऑलॉजिकल सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाला नसलेल्या आंबेमाचीतील लोक स्थलांतरीत होण्यासाठी विरोध करीत असताना तेथील फार्महाऊसचेही स्थलांतर केले जाणार काय, हा अनुत्तरित प्रश्न ग्रामस्थांना भेडसावणारा आहे. तालुक्यातील दाभिळ, हळदुळे, चिरेखिंड, वाकण धामणेची वाडी, कुडपण खुर्द व कुडपण बुद्रुक, किनेश्वर, खोपड, चांदके अशा सुमारे 18 गांवांमध्ये दरडीचा धोका निर्माण झाला असताना मोठी लोकसंख्या दरडप्रवण क्षेत्रामध्ये वास्तव्य करीत असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी, दरडग्रस्तांचे मसिहा बनण्याची मानसिकता काही राजकीय नेतृत्वामध्ये तयार झाली असताना सरकार आणि जनतेतील दुवा बनण्याऐवजी गोष्टीतील दोन माकडांच्या भांडणात खवा फस्त करणार्‍या बोक्यासारखे वर्तन होण्याआधी जनता आणि सरकारने आपसात माकडांसारखी ओढाताण न करता समन्वय करण्याची गरज निर्माण झाली आहे. एका बाधिताला चार घरे देण्याचा आभास निर्माण करून बाधितांना या आमिषाला भुलविण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांना मतांच्या बेगमीसह बाधितांचा प्रचंड पाठिंबा प्राप्त करण्याची संधीही ठरली होतीे. आताही दरडग्रस्त झालेल्या साखर सुतारवाडी आणि देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावातील पुनर्वसनाला आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुककामांचा राजकीय खोडा बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
-शैलेश पालकर

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply