कर्जत ः बातमीदार
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या माथेरान नाका येथील हुतात्मा चौकात हातगाडी लावून व्यवसाय करण्याचा प्रयत्न 9 ऑगस्टच्या रात्री झाला होता. एकीकडे ऑगस्ट क्रांतिदिवस साजरा होत असताना हातगाडी लावण्यात आली होती, मात्र स्मारक समितीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नेरळ पोलीस स्टेशनकडून हस्तक्षेप करण्यात आला आणि हातगाडी रात्रीच तेथून काढण्यात आली.
हुतात्मा चौक उभे राहिल्यानंतर व तेथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे अर्धपुतळे लावल्यानंतर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प लावण्यात आले आहे. अनेक वर्षे हुतात्मा चौकातील पावित्र्य राखण्याचा प्रयत्न होत आहे. दररोज स्वच्छता तसेच झाडांना पाणी घालणे ही कामे होतात, मात्र काही महिन्यांपूर्वी तेथे एका हॉटेलने जाहिरात फलक लावला असता हुतात्मा स्मारक समितीकडून नेरळ पोलीस ठाणे यांना सूचना केल्यानंतर दोन तासांत तो फलक
हटविला गेला होता.
9 ऑगस्टच्या रात्री कोणा व्यक्तीने हुतात्मा चौकातील हिरवळीवर व्यवसायासाठी हातगाडी लावली होती. त्याबद्दल कळताच हुतात्मा स्मारक समितीचे सदस्य तेथे पोहचले. त्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यास कळविण्यात आले. हुतात्मा चौकात ती हातगाडी बघून मोठा जनक्षोभ होऊ शकतो याची कल्पना असल्याने नेरळ पोलिसांकडून चक्रे फिरली आणि दोन तासांच्या आत ती हातगाडी तेथून हटविण्यात आली. याकामी पोलीस अधिकारी अविनाश पाटील व पोलीस नाईक समीर भोईर, बरगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे तसेच सदस्य अजय गायकवाड, सुमित क्षीरसागर, दर्वेश पालकर, माजी सरपंच भगवान चंचे, अनिल जैन, अनिल सुर्वे, नंदू कोळंबे, गोरख शेप, शेख, बंडू क्षीरसागर,जैतू पारधी आदी उपस्थित होते.