माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या 96 टक्के वादळग्रस्तांना नुकसानभरपाईची रक्कम वाटप केल्याचा माणगाव तहसीलदारांनी केलेला दावा खोटा असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्ञानदेव पवार यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
ज्ञानदेव पवार यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळ होऊन दोन महिने झाले तरी अजून अनेकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. आजही अनेक जण नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच तहसील कार्यालय किंवा शिक्षकवर्ग यांपैकी कोणीतरी वादळग्रस्तांचे घेतलेले बँकेचे खाते नंबर चुकविल्याने वादळग्रस्तांना अजूनही तहसीलमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. शिक्षकवर्ग बँक खाते नंबराबाबतची चूक आमची नसून तहसीलची असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तालुक्यातील जवळपास 50 टक्के वादळग्रस्तांच्या हातात अजूनही नुकसानभरपाईची रक्कम आली नाही. बँकेत फेर्या मारून वादळग्रस्तांच्या नाकी नऊ आले आहेत. तालुक्यातील ज्या 96 टक्के वादळग्रस्तांना नुकसानभरपाईचे वाटप केले त्यांची नावे बोर्डावर तसेच वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावी. मग जनतेसमोर सत्यस्थिती आल्याशिवाय राहणार नाही, अन्यथा अजूनही ज्या गावांतील वादळग्रस्तांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही त्यांना मी तहसीलदारांसमोर उभे करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने आजही अनेक गावांतील वादळग्रस्तांना शांत करून त्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांना तहसीलमध्ये एकत्रित येण्यासाठी रोखले नाही, तर वादळग्रस्तांचा उद्रेक निश्चित असल्याचा दावाही पवार यांनी या वेळी केला.
ज्ञानदेव पवार पुढे म्हणाले की, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मध्यंतरी जूनच्या 22 तारखेला सुतरवाडी येथे आपल्या बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना नुकसानभरपाईबाबत माहिती दिली होती. त्या वेळी त्यांनी 25 हजार ते त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना किमान 15 हजार रुपये तसेच कपडे, भांडी व अन्नधान्यासाठी 10 हजार रुपये वेगळे मिळतील, असे सांगितले होते. मग यामध्ये दुजाभाव का केला जात आहे, असा सवालही पवार यांनी केला. माणगावातील 25 हजारांपासून लाख, दीड लाखांपर्यंत नुकसान झालेल्या अनेक गोरगरीब वादळग्रस्तांच्या खात्यावर तहसीलने पाच, सहा, 10-12 हजार अशी रक्कम टाकली आहे. मग त्यांची उर्वरित रक्कम गेली कुठे? या सर्वांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, अन्यथा हे वादळग्रस्तही काही दिवसांत माणगाव तहसीलसमोर आंदोलन करणार आहेत. माणगावात बोगस पंचनामे झाले आहेत. तरीही प्रशासन वादळग्रस्तांना आलेली तुटपुंजी मदत देण्यास विलंब करून त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे. येत्या काही दिवसांत वादळग्रस्तांना त्यांच्या हक्काचे किमान 15 हजार रुपये मिळालेच पाहिजेत, अन्यथा तालुक्यातील वादळग्रस्तांना एकत्रितपणे तहसील कार्यालयावर आणण्यात येईल, असा इशाराही ज्ञानदेव पवार यांनी या वेळी दिला. याबाबत माणगाव तहसीलदारांची शिष्टमंडळाने भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडून वादळग्रस्तांसाठी 96 टक्के नुकसानभरपाईची रक्कम बँकेत गेली आहे.त्यांच्याकडून विलंब झाला असून 13 ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यावर रक्कम जमा करा, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगेन, असे बँकवाल्यांना लेखी ठणकावून सांगितले आहे. 25 हजार ते त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या वादळग्रस्तांना आपण 15 हजारांपर्यंत रक्कम दिली आहे. ज्यांना चुकून कमी रक्कम गेली असेल त्यांची नावे आमच्याकडे द्यावीत. त्यांंच्या पंचनाम्याची शहनिशा करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. ज्यांचे घर पूर्णपणे पडले त्याची पाहणी करून त्यांना तेवढी रक्कम दिली जाईल. ज्या वादळग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही त्याबद्दल रायगड जिल्हाधिकार्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांचाही प्रश्न निकाली काढू तसेच वादळग्रस्तांची नावे लेखी देऊ, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीला राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, माणगाव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी, भाजपच्या माणगाव तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे तसेच माणगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.