Breaking News

गणेशभक्तांचा होमक्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
परराज्यातून व परजिल्ह्यातून विशेषतः दीड आणि पाच दिवसांच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या भाविकांचा होम क्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.  
शासन आदेशानुसार कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या भाविकांना 10 दिवसांचे होम क्वारंटाइन करण्याचे आदेश काढण्यात आले असले तरी दीड व पाच दिवसांचे गणपती असलेल्या भाविकांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे होम क्वारंटाइनचा  कालावधी कमीत कमी करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले आहे.  
या निवेदनात म्हटले आहे की, दि. 29/07/2020 रोजीच्या परिपत्रकातील आदेशात क्रमांक 16 नुसार आपण गणेशोत्सवासाठी परराज्यातून, परजिल्ह्यातून येणार्‍या भाविकांना रायगड जिल्ह्यात 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे नमूद केले आहे. या आदेशामुळे
परराज्यातून व परजिल्ह्यातून दीड व पाच दिवसांच्या गणपतीसाठी येणार्‍या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः चाकरमानी व छोटे-मोठे उद्योगधंदे करणार्‍या व्यावसायिकांना दीड दिवसाच्या गणपतीसाठी आल्याने 14 दिवस होम क्वारंटाइन केल्यास नोकरीवर व छोटे-मोठे उद्योगधंदे करणार्‍या व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
दीड दिवसाच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या भाविकांना 14 दिवस होम क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याकरिता त्यांची जागेवरच आरोग्य तपासणी केल्यास भाविकांना होणारी अडचण दूर होण्यास मदत होईल. या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून विशेषत: दीड दिवसाच्या गणपतीसाठी रायगडात येणार्‍या भाविकांची आरोग्य तपासणी करून त्यांचा होम क्वारंटाईन कालावधी कमीत-कमी व्हावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply