Breaking News

कापड उद्योग थंडावला; कामगारांना लॉकडाऊनचा फटका; तयार माल विक्रीविना पडून

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील पोखरकरवाडीत स्थानिक युवक कापड व्यवसाय करीत आहेत, मात्र लॉकडाऊन काळात त्या 32 तरुणांचा व्यवसाय हिरावला गेला आहे. गणेशोत्सवावर आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाकडून गणेशोत्सवासाठी लागणार्‍या स्टेज डेकोरेशनची जेमतेम 25 टक्केच खरेदी झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कर्जत तालुक्यातील कापड व्यवसायातील बेरोजगारी वाढू लागली असून काम करणार्‍या कारागीरांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.

तालुक्यातील कशेळे येथील पोखरकरवाडी येथे राहणारा भरत आवारी हा तरुण कर्जत येथे आपल्या नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहून होता. त्याच्या नातेवाइकांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी कापड मंडपाचे काही भाग शिलाई मारून दुरुस्त करण्याचे काम भरत फावल्या वेळेत करायचा. 2003मध्ये पदवीनंतर कुठेतरी नोकरी करून कुटुंबाच्या पालनपोषणाचा विचार करून तसा प्रयत्न सुरू केला, परंतु नोकरीत मन रमत नसल्याने त्याने घरी टेलरिंग मशीन घेऊन डेकोरेटरसाठी गरजेचे असलेले मंडप बनविण्यास सुरुवात केली. तीन वर्षे हे काम करताना सजावटीचे पडदे, मंडप, घरातील गणपतीची कपड्यांची सजावट करण्यासाठी लागणारे तयार साहित्य उल्हासनगरच्या बाजारात देऊन पैसे मिळवू लागला. व्यवसायात मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू शकतात हे ध्यानात घेऊन भरत आवारीने पोखरकरवाडीतील तरुणांना एकत्र करून प्राची मंडप डेकोरेटर नावाने कारखाना सुरू केला. मोठे शेड बांधून तेथे आवारीने सुरू केलेल्या कारखान्यात आपल्या भावाच्या मदतीसाठी तानाजी हा भाऊ आपले कशेळे येथील दुकान बंद करून पुढे आला. दोघांनी मेहनतीने मोठा कारखाना उभारला. आवारी बंधूंच्या कारखान्यात 30 तरुण टेलरिंगचे काम करतात.

या वर्षी अचानक आलेल्या कोरोना संसर्गामुळे मार्चपासून वर्षभर सुरू असणारा कारखाना बंद होता. स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवारी बंधूंनी कापड व्यवसाय सुरू केला. नोव्हेंबर ते मे या कालावधीत डेकोरेटरचे डेकोरेशनसाठी लागणारे कापड हे आवारी यांच्या कारखान्यातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील किमान 500 डेकोरेटरांना जाते. त्यात लहान मोठा व्यवसाय करणारे डेकोरेटरदेखील मोठ्या प्रमाणात असतात, परंतु त्यांचे व्यवसाय बंद असल्याने शिवून ठेवलेले मंडप पोखरकरवाडी येथे पडून आहेत. 15 मेपासून गणेशोत्सव काळात लागणारे मंडप बनविण्याचे काम सुरू होते, मात्र या वर्षी हे काम 15 जुलैपासून सुरू करावे लागले. त्यामुळे दरवर्षी 30 हजार नग घरगुती गणेश मंडप बाहेर विक्रीसाठी जातात, परंतु यंदा केवळ 4000 गणेश मंडप

विक्रीसाठी रायगड, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कोकण, गोव्यापर्यंत गेले. मुंबईत मंगलदास, हिंदमाता, लालबागसारख्या मार्केटमध्ये तसेच मेड इन अमेरिका समजल्या जाणार्‍या उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा माल विक्रीसाठी जातो. या वर्षी मात्र ऑगस्टमध्ये हा माल बाजारात पोहचला. त्यामुळे निर्माण झालेली मंदी ही कापड व्यापार उद्ध्वस्त करणारी ठरत आहे.

आम्ही तरुणांना संधी देण्यासाठी व्यवसाय सुरू केला आहे. पोखरकरवाडीतील 32 तरुण, ज्यात अनेक जण पदवीधर आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आम्ही दोघे बंधू यशस्वी ठरलो आहोत, मात्र सध्याचा काळ प्रचंड नैराश्याचा असून त्यातही आम्ही चार महिने कारखाना बंद ठेवला असतानाही कारागिरांना एका महिन्याचे वेतन दिले आहे. लॉकडाऊनमुळे माल पडून असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

-भरत आवारी, संचालक

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply