कडाव ः प्रतिनिधी – संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनी अनावश्यक फिरणार्यांवर कडक पहारा ठेवला आहे. त्यात रायगडातील कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारीही एक पाऊल पुढे टाकत आपले कर्तव्य बजावत आहेत. काही नागरिक लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे खुलेआम बाइकस्वारी करीत होते. त्यामुळे या नागरिकांना कर्जत पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. परिणामी अशा मोकाट फिरणार्यांनी घरात बसणेच पसंत केले आहे.
कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता आपल्या तोंडावर रुमाल किंवा मास्कचा वापर न करता फिरत असल्याने कर्जत पोलिसांनी अशांना आवर घालताना चांगलीच समज दिली. एवढ्यावरच न थांबता अशा मोकाट आणि अनावश्यक फिरणार्यांविरोधात यापुढे अधिक कठोर पावले उचलणार असल्याचेही सांगितले.
राज्यातील पोलीस यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच कोरोनापासून सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सज्ज झाली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागासह पोलीस यंत्रणाही 24 तास डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहे, परंतु अजूनही काही नागरिक विनाकारण बाहेर प्रवास करताना दिसतात. हे त्यांचा परिवार व समाजासाठी घातक आहे.
-अरुण भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत