खोपोली ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील होराळे गावातील पंकज दळवी (25) या तरुणाचा बुधवारी रात्री एका स्कॉर्पिओ गाडीत मृतदेह आढळून आला. आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेलेल्या पंकजचा मृत्यू आणि तोही फिरायला गेलेल्या गाडीत झाल्याने अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. दारू पिऊन टोकाच्या वादातून की अन्य कोणत्या कारणास्तव पंकजचा मृत्यू झाला, असा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
पंकजसोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत पंकज हा गाडीतील मागच्या सीटवर दारू पिऊन झोपला होता. रस्त्यात असलेल्या स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली आणि पंकजचा हात झोपेत गाडीच्या दरवाजाच्या हँडलवर पडला. त्यामुळे गाडीचे दार उघडले व पंकज गाडीबाहेर रस्त्यावर पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. कारचालकाच्या लक्षात आल्यावर त्याने गाडी थांबवून पंकजला गाडीतील मधल्या सीटवर आडवे झोपवले आणि घराकडे गाडी घेऊन निघाला, मात्र रस्त्यात गाडीतील डिझेल संपल्यामुळे गाडी बंद पडली. पुढे सकाळपर्यंत पंकज गाडीतच झोपला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र पंचनाम्यावेळी पंकजचे डोके मागील बाजूकडून फुटले होते. अति रक्तस्त्राव झाल्याने पंकजचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय व घटनेतील सत्य काय याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. खालापूर पोलीस सर्व शक्यतांचा तपास करीत आहेत. दुसरीकडे
पंकजच्या कुटुंबातील सदस्यांनी हा घातपात असून यामागे वेगळे
काहीतरी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सदर घटना वावोशी उपपोलीस ठाणे क्षेत्रात घडली. वावोशी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जे. पी. म्हात्रे व पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांनी घटनेची माहिती खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे तसेच विभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील यांना दिली.