Breaking News

दक्षतेत ढिलेपणा नको

आजवरच्या एकूण कोविड-19 रुग्णांच्या संख्येत पुण्यातील संख्या रविवारी मुंबईच्याही पुढे गेल्याने पुणे शहर हे देशातील नवीन ‘कोरोना राजधानी’ बनले आहे. पुण्याच्या आधी देशातील सर्वाधिक कोरोना केसेसमध्ये मुंबई आघाडीवर होती. एकूण परिस्थिती पाहता आजही महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील स्थिती चिंताजनकच आहे. आणि या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असा सांस्कृतिक उत्सव असलेल्या गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.

देशातील एकूण कोरोना केसेसची संख्या सोमवारी 26 लाखाचा टप्पा ओलांडून पुढे गेली तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या तब्बल 50 हजार 921वर जाऊन पोहचली. महाराष्ट्राच्या संदर्भात हीच आकडेवारी पाहायची झाली तर राज्यातील एकूण कोरोना केसेसची संख्या सहा लाखाच्या जवळ जाऊन पोहचली आहे तर कोरोनामुळे आतापावेतो 20 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. रविवारी राज्यात या साथीच्या आजारातून बर्‍या झालेल्या आठ हजार 837 जणांना घरी जाऊ देण्यात आले. त्यामुळे राज्यातील बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या चार लाख 17 हजार 123 वर जाऊन पोहचली. कोरोनाचा प्रभाव सुरूवातीपासूनच देशाच्या निरनिराळ्या भागात विभिन्न तीव्रतेचा राहिला आहे. गुजरात, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये तुलनेने परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मात्र काही काळ परिस्थिती आटोक्यात आल्यासारखे वाटले आणि पुन्हा परिस्थिती चिंताजनकच भासू लागली आहे. आसाम आणि छत्तीसगढ या राज्यांमध्येही पुन्हा कोरोनाचा फैलाव जोमाने होण्याची चिन्हे दिसत आहेत. लॉकडाऊनला तर अवघी भारतीय जनता कंटाळली आहे. उपजीविकेचा प्रश्न अनेकांसमोर आ वासून उभा आहे. आपल्याकडील कोरोना मृत्यूदर कमी असल्याचे वारंवार चर्चिले जात असल्यामुळे की काय, लोकांमध्ये बेफिकिरी काहिशी वाढीस लागल्याचे नजरेस पडते. पुण्यासारख्या महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक माहेर घर मानल्या जाणार्‍या शहरात लोक मोठ्या संख्येने मास्कशिवाय हिंडताना नजरेस पडतात याला काय म्हणावे? राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध असे प्रयत्न झाले आणि त्याचे उत्तम परिणामही दिसून आले. परंतु काही तौलनिक अभ्यासांमध्ये अलीकडच्या काळात दिल्लीतील परिस्थितीतील ही सुधारणा मागे पडणार की काय, अशी चिंता पुन्हा डोके वर काढू लागली आहे. एकूण काय, राज्यांच्या सरकारांनी आपण परिस्थिती नियंत्रणात आणली असे म्हणत फुशारून जाण्याचे पूर्णपणे टाळायला हवे आहे. भारतातली एकंदर कोरोना विषयक परिस्थिती सुरूवातीला अपेक्षा होती त्यापेक्षा बरीच आटोक्यात असली तरी तेवढ्यावर समाधान मानून कसे चालेल? अद्याप कोरोनावरील यशस्वी लस हातात येण्याबद्दल नेमकेपणाने काहीच सांगता येणार नाही अशीच परिस्थिती आहे. रशियाने आपली लस सुरक्षित व प्रभावी असल्याची ग्वाही दिली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून या लशीला मान्यता मिळालेली नाही. नावाजली गेलेली दुसरी लस म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित होत असलेली लस भारतीयांच्या हातात येण्यास बहुदा वर्षअखेर उजाडेल असे दिसते आहे. देशातील कोरोनासंदर्भातील एकूण परिस्थिती नियंत्रणात असली तरी यापुढे नव्याने फैलावाची लाट येणार नाही याकडे अत्यंत सजगपणे लक्ष ठेवून रहावे लागणार आहे. दक्षता बाळगण्यातील ढिलेपणा जराही खपवून घेतला जाता कामा नये.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply