Breaking News

पर्यटकांवर करडी नजर

पोलिसांचा खडा पहारा; वर्षा सहलींचे बेत फ सले

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील पाणवठे तसेच इतर पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येदेखील काही हौशी तरुण-तरुणी माथेरानच्या डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येत होते, मात्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून येथे चोख बंदोबस्त ठेवला असून पर्यटकांसह स्थानिकांनाही धबधबे आणि माथेरानच्या रस्त्यांवर फिरकू दिले नाही. दरम्यान, तालुक्यातील अन्य धबधबेदेखील पर्यटकांपासून दूर असून तेथेही पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे पर्यटकांचे वर्षा सहलीचे बेत फोल ठरत आहेत.

पावसाळ्यात कर्जत आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात, मात्र अनेक जण मद्य पिऊन पाण्यात उतरतात. काहींना पोहता येत नाही. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. मागील पाच वर्षांत किमान 50 पर्यटकांचे जीव धबधब्यात वाहून जाऊन तसेच धरणात बुडून गेले आहेत. त्यात मुंबईपासून जवळ असल्याने होणारी गर्दी आणि त्या गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थादेखील राखता येत नव्हती. त्यामुळे शासनाने धबधबा, धरण क्षेत्रात एक किमी परिसरात जमावबंदी लागू केली आहे. कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण-पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू असल्याने कोणालाही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने जाता आले नाही.

 जमावबंदी आदेशात धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्यविक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक वळणांवर सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली भिजणे यावर बंदी राहणार आहे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, ध्वनी प्रदूषण होईल अशा आवाजात सार्वजनिक ठिकाणी संगीत यंत्रणा वाजविणे, ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती न करणे तसेच धबधब्याच्या एक किमी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना 22 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

असे आदेश लागू असतानाही काही पर्यटक दुचाकी घेऊन येत असल्याचे दिसून आले होते.त्यामुळे लॉकडाऊनमध्ये नेरळ पोलिसांनी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नेरळ-माथेरान घाटातील धबधबे यांच्याकडे जाणारा रस्ता जुलैपासून बंद केला. माथेरान येथील पर्यटनस्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद आहे. त्यामुळे घाटात कोणीही पर्यटक जाऊ नये यासाठी नेरळ पोलिसांनी कंबर कसली आहे. नेरळ पोलीस माथेरान रस्त्याचे प्रवेशद्वार असलेल्या हुतात्मा चौकात रस्ता बंद करून बसले आहेत. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले असून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला जाऊ दिले जात नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेरळ पोलिसांचा राबता तेथे असल्याने माथेरान घाटात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा वावर दिसून येत नाही. त्याचवेळी नेरळ मोहाचीवाडी येथून काही ट्रेकर्स हे पेब किल्ल्यावर जात असतात. त्यांचा मार्गही नेरळ पोलिसांनी शेलू येथे असलेल्या सीमा हद्द बंद करून आणि आनंदवाडी येथे पोलीस कर्मचारी लावून बंद केला आहे.

आम्ही आमचा 10 जणांचा स्टाफ जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी कामाला लावला आहे. लॉकडाऊन काळात फारसे गुन्हे घडत नसल्याने धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन नाहक जाणारे बळी रोखण्याचे काम आम्ही बंदोबस्त ठेवून करीत आहोत. मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी अद्याप एकही बळी धबधबे आणि धरणाच्या परिसरात गेलेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

-अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply