प्रशासनाचे भाविकांना आवाहन
नागोठणे : प्रतिनिधी
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक नागरिक शहरात येणार आहेत. नागोठणे शहरसुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने नागरिकांनी त्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन आणि गणेशोत्सव या संदर्भात सोमवारी (दि. 17) सायंकाळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्नेहल कोळी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, महावितरण कंपनीच्या रूपाली तांडेल, तलाठी सजाचे गणेश विटेकर, शिवाजी केंद्रे आदी उपस्थित होते.
क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती मुदतीचे पालन करीत नसल्याचे सरपंच डॉ. धात्रक यांनी निदर्शनास आणून दिल्यावर क्वारंटाइनची मुदत 14 नसून 28 दिवस असून, अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. रिलायन्स कंपनीने येथे स्थापन केलेल्या कोविड सेंटरमध्ये कंपनीकडून सहकार्य केले जात नसल्याचे किशोर जैन यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले व कंपनीच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. या वेळी आरोग्यविषयक धोरणांसंदर्भात तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होणार असल्याने ग्रामपंचायत तसेच महसूल विभागाने संयुक्तपणे येथे सोशल डिस्टन्सिंगचे तसेच मास्कचे पालन केले जाते का, याची तपासणी करावी. यात दुकानदार तसेच ग्राहक या दोघांचाही समावेश असून संबंधितांवर दोनवेळा दंडात्मक करूनही तिसर्यांदा हे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी, असा आदेशवजा सूचना केली. यावेळी विद्युत पुरवठा, रस्ते, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य संसर्गाला गणेशोत्सव पार पडल्यानंतर जोर चढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी दक्षता घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन डॉ. माने यांनी केले. उपस्थितांचे आभार मोहन दिवकर यांनी मानले.