कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील शेतकर्यांची पुलाअभावी पंचाईत झाली आहे. गावातील शेतकर्यांची 80 टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने शेतकर्यांना शेतीकडे जाण्यासाठी तब्बल सात-आठ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे.
मानिवली गावातील शेतकर्यांची पोश्री नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात शेती आहेत. मानिवली गावाच्या आजूबाजूला ग्रामस्थांची जेमतेम 25 टक्के जमीन असून, पावसाळ्यात गावकरी होडीच्या सहाय्याने शेतकर्यांना पलिकडे शेतीच्या कामासाठी सोडायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणायचे, मात्र 1972साली मानिवली येथे होडी परत येत असताना अपघात झाला होता. त्यात तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर पुरुष नदी पोहून बाहेर आले होते. त्यानंतर पोश्री नदी पार करण्यासाठी वापरात असलेली होडी कायमची बंद झाली. सन 1990मध्ये तेथे पूल बांधण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पाठपुरावा केल्यानंतर पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला गेला, पण पाच वर्षांत पुलासाठी केवळ खांब उभे राहिले. शेवटी 1996मध्ये लोखंडी प्लेट टाकून पुलावरून वाहतूक सुरू झाली, मात्र दीड वर्षात त्या लोखंडी प्लेट कोसळल्या. आता केवळ मानिवली येथे नदीवर पुलाच्या पाच खांबांपैकी दोनच खांब आपले अस्तित्व सांगत आहेत.
पूल कोसळल्याने आणि पुन्हा उभा होण्याची स्थिती दिसत नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेले मानिवली गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूल नसल्याने शेतकर्यांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी मानिवली गावातून वरई आणि पुढे चिकनपाडा गावातून माले होऊन पाषाणे येथे पोहोचावे लागते. शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक अवजारे घेऊन एवढे अंतर पायी पार करणे कठीण असल्याने मानिवली गावातील काही शेतकर्यांनी आर्थिक कुवत नसल्याने शेतीची कामे करणे थांबविले आहे. राज्य शासनाने हा पूल उभारावा, अशी मागणी शेतकर्यांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.