गेल्या दहा दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. ठाणे शहरात रिकव्हरी रेट 89 टक्के इतका झाला असून उत्तम रिकव्हरी रेट असलेले ठाणे हे देशभरातील दुसर्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. कल्याण-डोंबिवली, पालघर या भागांमध्ये गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत होते व तो आरोग्य यंत्रणांच्या चिंतेचा विषय झाला होता. बाप्पाचे स्वागत करण्यापूर्वी ही साथ किंचितशी ओसरलेली दिसते आहे हे खरे. परंतु हीच वेळ अधिक सावधगिरी बाळगण्याची आहे हे विसरून चालणार नाही.
महाराष्ट्राचा लाडका सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी एरव्ही महाराष्ट्रामध्ये या दिवसांत केवढी तरी गडबड उडालेली असते. बाजारापेठा वस्तूंनी खचाखच भरलेल्या असतात आणि श्रद्धाळू मराठी माणसे मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी धावपळ करीत असतात. कोणाला मखराचे सामान हवे असते तर कोणाला पूजेच्या सामग्रीचे वेध लागलेले असतात. बाप्पाची पूजा सांगण्यासाठी गावागावांतील पौरोहित्य करणार्यांना या दिवसांत मोठी मागणी असते. परंतु यंदाचा गणेशोत्सव वेगळा असणार आहे. म्हणजे बाप्पाच्या ठायी असलेली श्रद्धा तितकीच असेल, परंतु गणेश चतुर्थीची आरास मात्र दिसणार नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अवघ्या पृथ्वीतलावर भीषण संकट ओढवले आहे. त्या संकटाशी झगडताना आपल्याला अनेक निर्बंध पाळावे लागत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुण्याची सक्ती, तोंडावरती मास्क लावून वावरणे, गर्दीत जाणे टाळणे, एकमेकांच्या घरी जाण्याचे टाळणे अशा कितीतरी निर्बंधांच्या कचाट्यामध्ये यंदाचा गणेशोत्सव सापडला आहे. अर्थात हे निर्बंध सर्वांना पाळावेच लागतील कारण मुंबई महानगर प्रदेशातील कोविड-19ची साथ किंचित ओसरल्यासारखे दिसत असले तरी संकट अजुनही टळलेले नाही. लॉकडाऊन आणि अन्य संबंधित कारणांमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे संपूर्णत: मोडले आहे. बहुसंख्य व्यवसाय-उद्योगधंदे आणि दुकाने अजुनही चालू होऊ शकलेली नाहीत. पुरेशी काळजी घेऊन सारा व्यवहार सुरू करणे इष्ट ठरले असते. परंतु कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती परिपक्वपणे हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. खरे तर, कोरोनाशी लढण्याला नागरिक आता चांगलेच सरावले आहेत. पुरेशी काळजी घेऊन वेळीच उद्योग-व्यवहार सुरू झाले असते तर बाप्पाच्या स्वागतावर आलेले कोरोनाचे हे सावट कमी झाले असते. श्रद्धाळू मराठी भाविकांना अधिक धीराने आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि यथासांग पूजा करता आली असती. परंतु दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करून व्यवहार सुरळीत झाले असते तर गोरगरिबांना सहन करावी लागणारी रोजगार कपात काही प्रमाणात तरी कमी झाली असती तसेच नोकरकपातीचे प्रमाण देखील ओसरले असते. तूर्तास साथ काहिशी ओसरलेली असून देखील आजही मुंबई महानगर प्रदेशातील जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, उपाहारगृहे बंदच आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवांवर अतिशय कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे मुंबई परिसरातील रहिवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवा देखील ठप्पच आहे. अशा परिस्थितीत आपल्याला बाप्पाचे स्वागत करायचे आहे. कोरोनाशी प्रगल्भ आणि सकारात्मकपणे लढण्याची बुद्धी महाराष्ट्र सरकारला द्यावी, अशी प्रार्थना विघ्नहर्त्या बाप्पाकडे केलेली बरी!