पनवेल : रामप्रहर वृत्त
कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने कृष्णाष्टमी आणि मातृदिनानिमित्त ’कृष्णजन्म व मातृशक्ती’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. कल्याण येथील मंजिरी फडके या कार्यक्रमाच्या प्रमख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ’कृष्णजन्म आणि मातृशक्ती’ या विषयावर त्यानी विचार मांडले.
या विषयावर भाष्य करताना मातृशक्ती ही एक संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मातृशक्ती स्त्रियांपुरतीच मर्यादित नाही असा खुलासा त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर यांची उदाहरणे देऊन या महापुरुषांच्या ठायी त्यांच्या देशाप्रती आणि जनतेप्रति मातृशक्ती होती, असे त्या म्हणाल्या. श्रीमदभगवत गीतेमधील प्रसंग, भगवान श्रीकृष्ण यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच निसर्गाच्या ठायी दडलेल्या मातृशक्तीवरही त्यानी ओघवत्या वाणीने प्रबोधन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्स व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. देशाविदेशातील श्रोत्यांनी आपापल्या घरातूनच त्याचा लाभ घेतला. पनवेल समितीच्या अध्यक्ष वैजयंती बुवा, सचिव सुलक्षणा टिळक आणि विधा समन्वयक सुनिता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्य ऍड. जुईली चव्हाण आणि कोषाध्यक्ष निला आपटे यांनी कोकण प्रांत प्रचार सहप्रमुख स्वाती इंदुलकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम केला. प्रारंभी प्रांत कोशाध्यक्ष वैशाली कुलकर्णी यांनी संस्कार भारतीचे ध्येयगीतगायन केले. पनवेल समितीच्या अध्यक्ष वैजयंती बुवा यांच्या संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.