Breaking News

पनवेलमध्ये शेकापला भगदाड

नगरसेवकांच्या आप्तेष्टांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी आणि कामगार यांच्या नावाने राजकारण करीत स्वतःची पोळी भाजणार्‍या आणि मनमानी कारभार करणार्‍या शेकापला कार्यकर्त्यांसह जनता पुरती कंटाळलेली आहे. समाजकार्यापासून दूर गेलेल्या शेकापने प्रत्येकवेळी राजकारण केले. शेकापच्या या स्वार्थी राजकारणाला कंटाळून शुक्रवारी (दि. 21) गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पनवेल महानगरपालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांचे बंधू आणि शेकापच्या नगरसेविका शीतल केणी यांचे पती दिनेश केणी, नगरसेवक बबन मुकादम यांच्या पत्नी, महिला जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रिया मुकादम, नगरसेविका जयश्री म्हात्रे यांचे पती रविकांत म्हात्रे, शेकापचे चिटणीस कैलास घरत, पुरोगामी संघटना अध्यक्ष महेश साळुंखे, व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश घरत यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापला  भगदाड पडले आहे.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या सोहळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात विकासाची लाट आली आहे. त्यांची कार्यप्रणाली सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि सर्व समाजाच्या प्रगतीची आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाला.  
एकेकाळी दिमाखात वावरणार्‍या शेकापला लागलेली घरघर दिवसेंदिवस वाढत आहे. शेकाप पुढार्‍यांचे स्वार्थी राजकारण आता जनतेला कळून चुकले आहे. काम असेल तेव्हा कार्यकर्त्याला गोंजारायचे आणि काम झाल्यावर ढुंकूनही त्यांच्याकडे पहायचे नाही हा शेकापचा फंडा सर्वश्रुत आहे. शेकापची मतलबी वृत्ती जगजाहीर आहे. त्यामुळेच शेकापतील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी या पक्षापासून दूर राहाणेच पसंत केले आहे. त्या अनुषंगाने शेकापच्या डॅशिंग नेत्यांनी भाजपत जाहीर पक्षप्रवेश करीत ढोंगी पुढार्‍यांना जोरदार झटका दिला आहे.
या वेळी आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोरगरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी उपक्रम राबविले. पनवेलमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 80 हजारांहून अधिक लोकांना अन्नधान्य, मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त भोजन, मास्क, सॅनिटायझर, व इतर आवश्यक साहित्य दिले. उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनीही त्यांच्या मतदारसंघात नागरिकांना भरभरून मदत केली. कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केले याचा अभिमान आहे. त्यामुळे एक कुटूंब म्हणून आपण सर्व जण काम करीत राहू या.
आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बँकेचा लढा आपण लढत आहोत. या संदर्भात महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार कुचकामी ठरले. तरीदेखील विवेक पाटील यांनी ठेवीदारांचे लपून ठेवलेले पैसे बाहेर काढू, असा पुनरूच्चारही त्यांनी केला.
भाजप सर्वसामान्यांचा पक्ष : लोकनेते रामशेठ ठाकूर
भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष आहे. तळागाळातील घटकाचाही विकास झाला पाहिजे, असा मूलमंत्र जपणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा हा पक्ष आहे. तुम्ही देशाचा विकास आणि विचार करणार्‍या पक्षात दाखल झाला आहात. तुमच्यात काम करण्याची धमक आहे. त्यामुळे तुम्ही योग्य पर्याय निवडला असून, लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एकसंघ काम करीत राहू या, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. नगरसेवक हरेश केणी यांचा स्वभाव नॅच्यरल आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीत त्यांना मते मिळाली. त्यांच्या जागी शेकापचा दुसरा कुणी उमेदवार असता तर त्याला एवढी मते मिळाली नसती, असेही ते म्हणाले.
भाजप केवळ पक्ष नाही तर कुटूंब : रवींद्र चव्हाण  
भाजप हा केवळ पक्ष नाही तर मोठे कुटुंब आहे. रायगड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे रायगडच्या कुटूंबात सर्व जण सुरक्षित आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वतः हा भाजपचा मूलमंत्र आहे. येणारा काळ शतप्रतिशत भाजप आहे. सर्व विषयांना न्याय देण्याचे काम केंद्र सरकार आणि येणारे राज्य सरकार करीत राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाला अभिमान -आमदार प्रशांत ठाकूर  
देशाचे कणखर व सर्वसमावेशक नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशाला अभिमान आहे. संसदेत पहिल्यांदा गेल्यावर या लोकशाहीच्या मंदिराला नमन करून त्यांनी लोकशाहीचे महत्त्व जगाला पटवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्याचे काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तृत्वाने खरे करणारा नेता असून, या पक्षात काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे, असे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. विवेक पाटीलांनी समाजाला लुटले – आमदार महेश बालदी
समाजाचे 512 कोटी रुपये खाऊन भाड्याच्या आस्वाद बंगल्यात राहणारे शेकाप नेते विवेक पाटील यांना धुडकावून प्रवेश केलात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन! शेकापचा एक काळ होता, पण आता या भ्रष्ट नेत्यांमुळे पक्षाची अब्रू वेशीला टांगली आहे, असा हल्लाबोल उरणचे आमदार महेश बालदी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आले आणि विमानतळ, रेल्वे अशी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणीची अनेक कामे ठप्प झाली. हे सरकार विकासाच्या ऐवजी भकासावर भर देत आहे. त्यामुळे ही महाविकास आघाडी पाकिटमारांची गँग झाली आहे. हे आपल्या नादी लागतात. त्यांना राजकारणातून उठविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.
कोरोनोपेक्षा कर्नाळा बँक घोटाळा भयंकर -अरुणशेठ भगत
कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेचा घोटाळा करून आणली. सर्वसामान्य ठेवीदारांना उपाशी मारण्याचे काम या घोटाळ्याने केले. विवेक पाटील यांनी महापापाचे काम केले. सर्वांचा विश्वासघात केला, असा घणाघात भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केला.

माझ्याकडे महिला संघटना मोठी आहे. त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे. संघटनेच्या महिलांना न्याय मिळावा याकरिता मी आज प्रवेश केला आहे. मला काम करण्याची संधी द्या, मी संधीचे सोने करीन. पक्षवाढीसाठी सतत काम करीत राहीन.
-प्रिया मुकादम

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …

Leave a Reply