आमदार गणेश नाईकांचा पालकमंत्र्यांना इशारा
नवी मुंबई : बातमीदार – आरोग्य विभागात ठाणेकरांच्या आशीर्वादाने कोणताही अनुभव नसताना व उपवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकार्यांची व त्यांनी केलेल्या कामांची व दिलेल्या कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानिमित्ताने नवी मुंबईतील राजकारणाला उकळी फुटली असून आमदार नाईकांनी आयुक्तांना दिलेला इशारा थेट पालकमंत्र्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे प्रशासक म्हणून कार्यरत होते, मिसाळ यांच्यानंतर विद्यमान आयुक्त अभिजित बांगर हे प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार पाहत आहेत. अभिजित बांगर आल्यापासून आमदार गणेश नाईक दौरे करीत आहेत. दर सोमवार अथवा मंगळवारी आमदार नाईक हे आयुक्त बांगरांना भेटून मागील आठवड्यातील स्वतः केलेल्या सूचनांचा आढावा घेत नव्या सूचना करत आहेत. तसेच नागरिकांच्या हितार्थ अशा मागण्या करीत आहेत.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या काळात सूचना व कामे मार्गी लागत नसताना पालिकेवर मॉनिटरिंग कोणाचे? अशी मळमळ आमदार नाईकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत ठाणेकरांच्या मर्जीतील अधिकार्यांची नियुक्ती पालिकेतील वरिष्ठ पदांवर करत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे आमदार नाईकांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात मोनिटरिंगवरून भूमिका व्यक्त केली होती. आमदार नाईक हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आयुक्तांसोबत भेटी घेत आहेत.