मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील मतदान केंद्रावर सोमवारी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुरूड तालुक्यातील सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान 65 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज निवडणूक अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग-मुरूड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.34 टक्के मतदान झाले होते. मुरूड तालुक्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह जाणवत होता. ग्रामीण भागात तर मतदानासाठी अक्षरशः लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत हे मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.