भाजपची मागणी
मुंबई ः प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात उत्सवाची नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरणार्या भाजपने आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. या वेळी मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून याबाबतची मागणी केली आहे.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मूर्तिकार देवीची मूर्ती घडविण्यास सुरुवात करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार? नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम या उत्सवालाही लागू असतील की त्यात बदल होणार? याबाबत मूर्तिकारांना वेळीच माहिती मिळण्याची आवश्यकता आहे, असे अॅड. शेलार यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे आधीच मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे. मूर्तींच्या उंचीबाबत स्पष्टता होण्यास उशीर झाल्याने चार फुटांपेक्षा उंच असलेल्या अनेक मूर्ती कारखान्यात शिल्लक आहेत. मोठ्या संख्येने मूर्तिकार व कारखाने असलेल्या पेणमधील दोहे, हरामपूर, केळवे या गावांचे 20 ते 25 कोटींचे आर्थिक नुकसान झाले. तेच मूर्तिकार आता देवीच्या मूर्ती घडविणार असल्याने वेळीच सरकारने स्पष्टता आणणे गरजेचे आहे. मुंबईत देवीच्या मूर्ती घडविणारे पाच हजार मूर्तिकार व कारखाने आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मूर्तिकार एक छोटी इंडस्ट्री असून हजारो कामगार, कारागिरांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे.
इतर उद्योगांप्रमाणे या उद्योगालाही कोरोनाची झळ बसली. त्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून उत्सवाची नियमावली सरकारने वेळीच जाहीर करावी. त्यासाठी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणीही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रातून केली आहे.