भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांची पोलीस संरक्षणाची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी
जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळपाहणी अहवालाची प्रक्रिया राबविली, पण स्थानिकांनी ती कंपनीच्या इशार्यावर उधळून लावली होती. या प्रकरणात कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासाकडून जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनामार्फत केली आहे.
संरक्षित असणार्या कांदळवनांची कत्तल तसेच खाडीत बेकायदा भराव करून जेएसडब्ल्यू कंपनी कायदा धाब्यावर बसवत आहे. याबाबत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वनसंरक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार 16 सप्टेंबर रोजी वन विभागाने स्थळपाहणी करण्याचे ठरवले होते. पंचनाम्यासाठी संबंधितांना नोटीसही देण्यात आली होती. जागेवर पोचल्यानंतर सुमारे 80 नागिरक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कंपनीच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्थळपाहणी अहवाल रोखला, असे सांगून अॅड. मोहिते म्हणाले की, माझे सहकारी परशुराम म्हात्रे, अनंता पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील यांना या वेळी धमकवण्यास सुरुवात झाली. जमाव मोठा असल्याने वडखळ पोलीस ठाण्यातील एक पोलीस, वन विभागाचे अधिकारी, खारभूमी विभागाचे अधिकारी हतबल झाले होते.
जेएसडब्ल्यू कंपनीने षडयंत्र रचून स्थळपाहणीच्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. कंपनीने केलेली कृत्ये बाहेर काढत असल्याने माझ्या जीवितास कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासनाकडून धोका निर्माण झाला आहे. भाजपाच जिल्हाध्यक्ष असल्याने रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. संबंधितांकडून माझ्याबाबत घातपात होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अॅड. मोहिते यांनी अर्जाद्वारे केली आहे तसेच सरकारी कामात अडथळा आणणार्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.