पोशीर ग्रामस्थांनी काम पाडले बंद; पुन्हा काम सुरू केल्यास आंदोलन
कर्जत : बातमीदार
नेरळ – कळंब रस्त्याची साईडपट्टी खोदून तीव्र क्षमते (22केव्ही)ची भूमिगत विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे पोशीर ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत किमान 20वेळा ही केबल टाकण्याचे काम बंद पाडले आहे, तरीदेखील ठेकेदार मनमानी करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावरील वरई एक्झर्बिया गृहसंकुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य महामार्गाची साईडपट्टी खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम बेकायदा असल्याचा आरोप करून पोशीर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय राणे यांनी ठेकेदाराला काम थांबवण्यास सांगितले आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौधरी यांनी घटनास्थळी जावून ठेकेदाराकडे असलेल्या परवानगीची कागदपत्रे मागितली असता, ठेकेदाराला ती देता आली नाही. त्यामुळे हे खोदकाम तातडीने थांबविण्याचे निर्देश शाखा अभियंता चौधरी यांनी दिले आहेत.
दरम्यान, ग्रामस्थांच्या विरोधामुळे ठेकेदाराने खोदकाम थांबवले असले तरी त्याने उकरुन ठेवलेली माती रस्त्यावरच टाकली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ही विद्युत वहिनी काही ठिकाणी दोन फूट तर काही ठिकाणी चार फूट खोल टाकण्यात आल्याने भविष्यात शेतकर्यांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठेकेदाराने हे काम पुन्हा सुरु केल्यास, ते काम तीव्र आंदोलन छेडून बंद पाडण्याचा इशारा पोशीर ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला आहे.
एक्झर्बियाच्या ठेकेदाराकडे भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याची कोणतीही परवानगी नाही. तरीही विद्यूतवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची साइडपट्टी खोदण्याचे काम सुरू आहे. साइडपट्टी खोदल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. पुन्हा काम सुरू केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल.
-दत्तात्रय राणे, ग्रामपंचायत सदस्य, पोशीर, ता. कर्जत