Breaking News

महामानव कर्मवीर भाऊराव पाटील

महात्मा गौतम बुद्ध म्हणतात, स्वयंप्रकाशित व्हा, स्वावलंबी व्हा. भगवान महावीर म्हणतात, हे पुरुषा! तूच तुझा मित्र आहेस. बाहेरच्या मित्राची इच्छा कशाला करतोस? महात्मा बसवेश्वर यांच्या मते आपल्या जीवनातील समृद्धी, उज्ज्वल प्रतिष्ठा ही स्वकष्टावर अवलंबून असते. गुरुनानक यांनी श्रमाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. स्वत: कष्ट करून उदरनिर्वाह करावा, असे ते आग्रहाने सांगत. स्वत: कष्ट करून धान्य पिकवत. अध्यात्मात जे स्वावलंबन श्रेष्ठ व परमोच्च मानले जाते तेच स्वावलंबनाचे परमतत्त्व ऐहिक व सांसारिक उन्नतीसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारले व ते सार्वजनिक केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले (जि. सातारा) येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे झाले. कर्मवीरांनी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी 1927 साली या वसतिगृहास भेट दिली. महात्मा गांधींनी या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस, सातारा’ असे नामकरण केले. अण्णांनी आपल्या आयुष्यात ग्रामीण शैक्षणिक कार्याचा जो प्रचंड वटवृक्ष उभा केला त्याचे स्फूर्तिस्थान छत्रपती शाहू

महाराज हे आहेत. 1927 सालामध्ये अण्णा व सौ. लक्ष्मीबाई धनिणीच्या बागेत राहावयास आले. दोघांना खूप आनंद झाला. त्या वेळेला वसतिगृहात 40 विद्यार्थी होते. रयत शिक्षण संस्थेच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. अण्णांच्या सामाजिक कार्यामुळे थोडीफार आर्थिक मदत वसतिगृहाला मिळत होती. सातारा येथे जून 1947मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालय सुरू केले. श्रमाच्या मोबदल्यात मोफत उच्च शिक्षण द्यायचे हा प्रयोग कर्मवीरांनी 1947मध्ये सुरू केला. ‘कमवा आणि शिका’ हा त्यांचा मंत्र होता. ‘कमवा आणि शिका’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’ ही अण्णांची शिकवण आहे.

स्वावलंबन हा कर्मवीरांच्या समग्र कार्याचा पाया आहेे. अण्णांनी स्वावलंबनाला व शरीरश्रमाला अत्यंत महत्त्व दिले. रयत शिक्षण संस्थेची बहुतेक वसतिगृहे, शाळा, महाविद्यालये ही विद्यार्थ्यांनी स्वत: बांधली आहेत. कर्मवीरांनी परावलंबी समाजापुढे स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवला आहे. ‘कमवा व शिका’ या योजनेमधून तसेच शाहू बोर्डिंगमधून स्वतंत्र विचारांची एक पिढी निर्माण झाली. परिस्थितीशी जुळवून घेणारी ही पिढी अत्यंत स्वावलंबी आहे. रयत शिक्षण संस्था व शाहू बोर्डिंगने अनेकांना विद्याविभूषित केले. ते शिक्षण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, पत्रकारिता तसेच प्रशासकीय क्षेत्रात अत्यंत यशस्वी झाले आहेत. याच वसतिगृहातून आदरणीय श्री. रामशेठ ठाकूर यांच्यासारखा एक मोठा आधारस्तंभ या महाराष्ट्राला लाभला. ते म्हणतात, ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे पनवेल-उरणमध्ये शाळा सुरू झाल्या. उच्च शिक्षणासाठी आम्हाला सातार्‍याला जावे लागले. आमच्यावर कर्मवीर अण्णांची जी छाप पडली ती आयुष्यभर टिकली. दोनदा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व, उद्योजक म्हणून वाटचाल आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची उमेद रयत शिक्षण संस्थेमुळे मला मिळाली.’ आदरणीय श्री. रामशेठ ठाकूर म्हणतात, ‘स्वत:चा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली’. रयत शिक्षण संस्थेच्या 61 शाखा मुंबई, रायगड व ठाणे जिल्ह्यात आहेत. येथील माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, आश्रमशाळा मा. रामशेठ ठाकूर यांनी शैक्षणिकद़ृष्ट्या अत्यंत समृद्ध केल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेवर श्रद्धा ठेवून व तीच तत्त्वे अंगीकारून सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचा माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. युवा नेते माननीय परेश ठाकूर यांचे रयत शिक्षण संस्थेशी अतूट नाते आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत स्वागतार्ह आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील हे अत्यंत सरळमार्गी होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. जनतेकडून मिळालेला पैसा अत्यंत काटकसरीने व काळजीपूर्वक खर्च केला जात असे. अण्णांचे कार्य इतके लोकाभिमुख झाले की लोक त्यांना बोलावून देणगी देत असत. संस्थेसाठी जनतेने जी संपत्ती दिली, तिला कर्मवीरांनी स्वार्थाने कधीच स्पर्श केला नाही. संपत्तीचा मोह, लोभ अण्णांना कधीच नव्हता. ते कोणाही माणसाकडे गेले असता त्यांचा खूप आदर-सत्कार होई. अण्णांचे बालपण कुंभोजला गेले. आचार्य शांतिसागर महाराज, आचार्य समन्तभद्र महाराज यांच्या आचार-विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला होता. जैन धर्मातील अहिंसा, सत्य-अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या प्राणभूत तत्त्वांचा स्वीकार त्यांनी श्रद्धेने केला. ही तत्त्वे प्रत्यक्ष आचरणात आणली.

अण्णांचे वडील स्वभावाने अतिशय चांगले होते. चांगले बोलावे, चांगले वागावे, लवकर उठावे, आठ हात लाकूड, दहा हात ढलपी असे कधी वागू नये, अशी त्यांची शिकवण असे. ते साधे, शांत स्वभावाचे व अतिशय सज्जन गृहस्थ होते. ते पापभिरू, सत्याने वागणारे, सत्य, अहिंसा, सदाचार यांचे आचरण करणारे, वृत्तीने पुरोगामी व उदार अंत:करणाचे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय कार्याला परंपरेने मिळालेला हा वारसा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील प्रत्येक काम प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक करत. त्यांच्या कामाची तडफ, काम करण्याची पद्धत, सचोटी वाखाणण्यासारखी होती. प्रेम, मैत्री, अनुकंपा, निर्भयता, संतोष, समृद्धी, विवेकशीलता, सुशीलता, वात्सल्य, सुलभता, गंभीरता, दया, करुणा, आर्द्रव, उदारता, प्रीति, नीति, ज्ञान, लोकप्रियता, कुलीनता या गुण समुच्चयाने अण्णांचे जीवन सुगंधित झाले आहे. प्राचीन काळापासून ही परंपरा राहिली आहे की ॠषीमुनी आणि विद्वान लोक ज्या कार्याचा प्रारंभ करीत असत, त्याअगोदर ते देवाचे स्मरण करीत असत. ज्यामुळे ते कार्य सफलतापूर्वक संपन्न होऊ शकेल. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या आईस देव मानत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करण्यापूर्वी ते आपल्या आईस नमस्कार करीत व आशीर्वाद घेत.

वसतिगृहातील मुले काटकसरी, नियमित, स्वावलंबी, उद्योगी, उत्साही व शीलवान असावीत असे अण्णांना वाटायचे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ‘कमवा आणि शिका’, ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’ हे सूत्र, हे वचन अपूर्वाइचे आहे. हे सूत्र मैलावरच्या दगडासारखे आहे. अत्यंत मोलाचे आहे. प्रत्येकाने गाठ बांधून ठेवावे असे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था आहे. आदरणीय शरदराव पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभारून तळागाळात शिक्षण पोहचविण्याचे काम केले. आज शिक्षण पद्धती बदलत चालली आहे. त्यानुसार संस्थाही विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम करीत आहे.’

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांना आमचे विनम्र अभिवादन!

-प्रा. डॉ. व्ही. एन. रणदिवे 52 बंगला, निलेटा गार्डन, पनवेल. मोबाइल : 9702857024.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply