पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार; पक्ष सदस्य नोंदणीला तालुक्यात जोरदार प्रारंभ
पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यात भाजप मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शनिवारी (दि. 6) पालीतील भाजप संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख व पदाधिकार्यांनी अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी यावेळी केले.
सदस्य नोंदणी अभियानामुळे पक्षाला नवनवीन कार्यकर्ते मिळत गेले. यातूनच पक्ष संघटना मजबूत होत गेली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत होत असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती; जिल्हा परिषदेत आपली सत्ता प्रस्थापित झालेली दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते चंद्रकांत घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
विकास आणि देशप्रेम केवळ भाजपच्या विचारधारेत सामावले असल्याचे सर्वांना पटू लागले आहे. त्यामुळे भाजपची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असून, बहुजन समाजदेखील भाजपच्या प्रवाहात सामिल होताना दिसत आहे, ही बाब समाधानकारक आहे. भविष्यात सुधागड तालुक्यात भाजप क्रमांक 1चा पक्ष झालेला दिसेल, असे जिल्हा चिटणीस राजेश मपारा यांनी सांगितले.
राज्य व देशात भाजपचे विकासात्मक व संघटनात्मक काम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. या मतदारसंघातून भाजपचा आमदार निवडून यावा, यासाठी आपापसातील मतभेद बाजूला सारून सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी सांगितले.
सुधागड पंचायत समितीचा पुढचा सभापती भाजपचाच असेल असा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केला. भाजपचे सुधागड तालुका सरचिटणीस आलाप मेहता, निखिल शहा, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, आतोने ग्रामपंचायत सरपंच रोहन दगडे, अडुळसे ग्रामपंचायत सरपंच भाऊ कोकरे, वा. सु. मराठे, अरुण खंडागळे, शरद चोरगे, अभिजित घाटवळ, चंद्रकांत पाठारे, ज्ञानेश्वर कुडपणे, नथुराम सकपाळ, धनराज सागळे, आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.