राज्यातील मच्छीमारांसाठी ठरणार वरदान
25 हजार रोजगार होणार उपलब्ध
आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न
उरण : प्रतिनिधी – मुंबई येथील असलेल्या ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्यावत, अत्याधुनिक उभारण्यात येत असलेल्या बंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे. पश्चिम किनार्यावरील महत्वाच्या या बंदरात एक हजार मच्छीमार बोटी लॅण्ड होण्याच्या क्षमता असलेले बंदर राज्यातील मच्छीमारांसाठी वरदान ठरणार आहेच. शिवाय या मासेमारी बंदरामुळे परिसरातील 25 हजार नागरिक, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे. या बंदरासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने हे बंदर लवकरच पूर्णत्वास येत आहे.
मुंबईत मच्छीमारांसाठी ससुनडॉक आणि भाऊचा धक्का जवळील कसारा बंदर (न्यु फिश जेट्टी) अशी दोन बंदरे आहेत. कसारा बंदर या आधीच गुजराती मच्छी मच्छिमारांसाठी सरकारने देऊन टाकले आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, पालघर, ठाणे या तीन जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी मुंबईतील ससुनडॉक हेच एकमेव बंदर उरले आहे. या चारही जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससुनडॉक बंदराच्या आश्रयाला येतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापुर्वी ससुनडॉक बंदरातच डिझेल, बर्फ आणि इतर आवश्यक साधनसामुग्री बोटीत भरण्यात येते.
मासेमारी करुन परतल्यानंतर याच बंदरात मासळी उतरवतात व लिलाव करुन मासळी विक्री करतात. ससुनडॉक बंदरात 700 मासेमारी बोटीं लागण्याची क्षमता आहे. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने वर्षोवर्ष हजारो मच्छीमार बोटी ससुनडॉक बंदरातच लँड होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने ससुनडॉक बंदरात मच्छीमार बोटी येत असल्याने मोठी गर्दी होते. यामुळे बंदरावर मोठा ताण पडत असल्याने मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची पाळी येते.
रायगड जिल्हयातील करंजा बंदरात अद्यावत, सर्व सोयींयुक्त आधुनिक बंदर उभारण्यातच यावे अशी मागणी सातत्याने मच्छीमारांकडून केली जात होती. त्यामुळे शासनानेही मच्छिमारांच्या मागणीची दखल घेऊन करंजा खाडी किनारी एक हजार मच्छीमार बोटी लागण्याची क्षमतेचे अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत 64 कोटी खर्चाच्या कामाला 2012 सालात निधी मंजुर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. करंजा बंदराचे दोन टप्प्यात काम करण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यातील 250 मीटर लांबीचे काम सुरु करण्यात आले होते.
मात्र समुद्राच्या तळाशी अवघड खडक लागल्याने वाढत्या खर्चामुळे बंदराचे काम रखडले होते. खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त वाढलेल्या खर्चामुळे बंदराचे काम 149.80 कोटींपर्यंत पोहचला होता. दरम्यान, रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराचा विस्तार आणि मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी करंजा मच्छीमार संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष शिवदास नाखवा, माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा विद्यमान अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी जेएनपीटीचे तत्कालिन विश्वस्त तथा विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून 75 कोटी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 कोटी रुपये असा एकूण 150 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. केंद्र आणि राज्य सरकारने समसमान निधी देण्याच्या मंजुरीनंतर 2018 मध्ये पुन्हा एकदा बंदराच्या कामाला सुरूवात झाली आहे.
कामासाठी केंद्र सरकारकडून आवश्यकतेनुसार तत्काळ निधी उपलब्ध होत आहे. कोरोना दरम्यान बंदराच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र बंदराचे काम पुन्हा जोमात सुरू झाल्यानंतर ड्रेजिंग, ब्लॉक कास्टिंग तसेच इंग्रजी ई आकारापैकी ’सी’ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. कॉक्रीट, बॅकफिलिंग आदी उरलेली कामेही लवकरच आटोक्यात येणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण करंजा मच्छीमार बंंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार असुन बंदर राज्यातील मच्छी मच्छीमारांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.
बंदराची वैशिष्ट्ये
600 मीटर लांबीचे इंग्रजी ’ ई ’ आकाराचे बंदर, आधुनिक फिश लॅडिंग जेट्टी, वेस्टवॉटर ट्रिंटमेंट प्लाण्ट, रेडिओ अॅण्ड कम्युनिकेशन सेंटर, फिश प्रोसेसर, शितगृह, मासळी लिलाव आणि विक्री केंद्र, डिझेल पंप, इत्यादी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.