Breaking News

हेल्मेटसक्ती कागदावरच

कारवाईमुळे कर्मचारी आणि पोलीस उदासीन

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र पनवेल महापालिकेत या योजनेची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केलेल्या एकाही कर्मचार्‍यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. पनवेल महापालिकेच्या इमारतीला स्वतंत्र कॅम्पस नसल्यामुळे ही हेल्मेटसक्तीची योजना राबवता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सवय लावण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्तालयाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. हेल्मेट न घातल्यामुळे मागील वर्षभरात 258 जणांचा मृत्यू झाला, तर 920 जण जखमी झाले. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणार्‍यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आयुक्त संजय कुमार यांनी ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ असा उपक्रम सुरू केला. एखाद्या सरकारी कार्यालयात दुचाकीवरून येणार्‍या कर्मचार्‍याने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला प्रवेशद्वारावरच अडवून कार्यालयात प्रवेश द्यायचा नाही, अशी ही योजना आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या भव्य इमारतीच्या हद्दीत हेल्मेट न घालता कामावर येणार्‍या अनेक कर्मचार्‍यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. अनेक वेळा वाहतूक पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय राज्य सरकारच्या विविध विभागांची कार्यालये असलेल्या कोकण भवन परिसरातही हा उपक्रम राबवून हेल्मेटसक्ती करण्यात आली.

नवी मुंबईतील विविध मॉलमध्येदेखील ही योजना राबवण्यात पोलिसांना यश मिळाले. पनवेल महापालिकेतील कर्मचार्‍यांसाठीदेखील ही योजना राबवून हेल्मेटसक्ती करण्यात आली. पनवेल महापालिकेचे मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी या माहितीचे परिपत्रक 29 मार्च रोजी प्रसिद्ध करून ही योजना राबविण्यात येत असल्याचे जाहीर केले. हेल्मेट घालून आल्याची माहिती मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना देऊनच प्रवेश करायचा, असे या पत्रकात नमूद केले होते. 4 एप्रिलपासून हे आदेश अमलात आणल्याचे सांगण्यात आले. जे अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत, त्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती गृहित धरून वेतन कापण्याचेही यात नमूद केले होते, मात्र पनवेल महापालिकेच्या आवारात ही हेल्मेटसक्ती केल्यापासून आजवर एकाही कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली नाही. ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ ही योजना पनवेल महापालिकेच्या परिपत्रकापुरती मर्यादित राहिल्याचे महिनाभरानंतर निदर्शनास आले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply