Breaking News

अभिमानास्पद गगनभरारी

भारतीय वायुदलाचा स्थापना दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नभ:स्पृशं दीप्तम् असे ब्रीदवाक्य असलेल्या हवाई दलाच्या 88व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आकाशात विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या. अलीकडच्या काळात शत्रूंचा त्रास वाढला असताना भारताची ताकद यानिमित्ताने जगाला दिसली.

भारताच्या हवाई दलाची स्थापना 88 वर्षांपूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली होती. जगातील सर्वांत शक्तीशाली असलेल्या हवाई दलांमध्ये भारताचे हवाई दल हे चौथ्या स्थानावर आहे. या दलाचे नाव 1945मध्ये रॉयल इंडियन एअरफोर्स असे करण्यात आले होते. त्यानंतर पाच वर्षांनी नावातील रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला. या दलाने आजवर अनेक पराक्रम गाजवून शत्रूला नामोहरम केलेले आहे. पाकिस्तानला तर अनेकदा धडा शिकविल्याचा इतिहास आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकसोबतच चीनही सीमेवर डोके वर काढू लागला आहे. ‘ड्रॅगन’कडून सातत्याने आगळीक केली जात असून, घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले असले तरी सीमेवरील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत, मात्र त्यातून तोडगा निघत नाही. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर कशा प्रकारे सामना करायचा याचा अ‍ॅक्शन प्लान तयार झाल्याची लष्करी सूत्रांची माहिती आहे. अशा वेळी हवाई दल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर देशाने शत्रूंवर आघाडी मिळवली आहे. फ्रान्सहून लढाऊ राफेल विमाने 29 जुलैला भारतीय भूमीवर उतरली होती. अणुहल्ला करण्यास सक्षम आणि अनेक घातक हत्यारांनी युक्त असलेल्या या विमानांनी वायूदलाच्या वर्धापन दिनी गुरुवारी हिंडन हवाईतळावरून आकाशात झेपावत थरारक प्रात्यक्षिके दाखवली. याशिवाय राफेल, सुखोई, मिग-29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचाही कवायतींमध्ये समावेश होता, परंतु राफेल लढाऊ विमान हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले. भारताने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. यापैकी 30 विमाने ही लढाऊ असून, इतर सहा प्रशिक्षक पातळीवरील आहेत. पहाडी तसेच लडाखसारख्या खडतर परिस्थिती असलेल्या भागात राफेल विमाने शत्रूसाठी घातक सिद्ध होणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल लढाऊ विमाने दाखल झाल्याने भारताला पाकिस्तान आणि चीनवर मोठी आघाडी मिळवता आली आहे. आपल्या देशात हवाई दलाची एकूण 60 एअरबेस आहेत तसेच एकूण 1700 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स ताफ्यात आहेत. हवाई दलांच्या एअरबेसची सात कमांडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारताबाहेर तझाकिस्तानमधील फर्कहोर येथेही भारतीय हवाई दलाचे एअरबेस आहे. असा एअरबेस देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे. भारतीय वायूदलाने आजवर देशाच्या संरक्षणात आणि शत्रूराष्ट्रावर जरब ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हे दल काळानुरूप अत्याधुनिक आणि अधिक शक्तिशाली होत असून, देश संरक्षण आणि नव्या आव्हानांवर मात करण्यासाठी कायमच सज्ज आहे. त्यासाठी या दलातील सर्व शूरवीरांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply