Breaking News

‘आगरी दर्पण’च्या विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी

आगरी दर्पण मासिकाच्या प्रा. एम. पी. तथा मधू पाटील कृतज्ञता गौरव विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 18) एम. पीं.च्या 93व्या वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी समाज नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कवीवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कवी अरुण म्हात्रे, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, ठाणे जि. प.चे माजी सदस्य वसंत पाटील, डॉ. उर्मिला कबरे, विलास कबरे, आगरी दर्पणचे सहव्यवस्थापक श्याम मोकल, डी. बी. पाटील, कवी संकेत म्हात्रे, चित्रकार संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रारंभी आगरी दर्पणचे संपादक दीपक म्हात्रे यांनी या विशेषांकाविषयी माहिती देऊन यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, प्रा. एम. पी. पाटील यांचे शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कर्तृत्व फार मोठे आहे. डॉ. म. सु. पाटील, प्रा. गंगाधर पाटील आणि प्रा. एम. पी. पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.शेकडो सुसंस्कृत आणि सुविद्द विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख नव्या पिढीला व्हावी व त्यांच्या विषयी सामाजिक बांधिलकीतून कृतज्ञता व्यक्त करावी, ही आमची भावना आहे.

समाज नेते जगन्नाथ पाटील, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे यांनीही एम. पी. यांच्या अनेक आठवणी जागवल्या. कवी अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, संकेत म्हात्रे यांनी कविता सादर केल्या. तसेच प्रा. विजया पाटील व प्रा. अनिरुद्द पाटील यांनी, अरुण म्हात्रे लिखित कविता कशी सूचते यांचे संहिता वाचन केले. तर ज्ञानेश्वरी मुंडे हिने गाणी गायली.

आगरी दर्पणचे मुखपृष्ठ तयार करणारे चित्रकार संजय कुलकर्णी यांचा त्यांनी काढलेल्या एम.पीं.च्या रेखाचित्राची प्रतिमा संपादक दीपक म्हात्रे व जे. डी. तांडेल यांच्या हस्ते भेट देण्यात आली. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश लब्दे यांनी केले. शेवटी प्रा. एम.पी.पाटील यांनी आगरी दर्पणच्या संपादक मंडळाने अतिशय मेहनत घेऊन चांगला अंक काढला त्याबद्दल धन्यवाद देत  उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply