माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था
आयसीसी महिला वर्ल्डकप 2022च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने प्रथमच पराभव केला होता. या पराभवाचा बदला महिला संघाने घेतला. इतक नाही तर महिला संघाने पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची परंपरा कामय ठेवली. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताची अवस्था 6 बाद 114 अशी झाली होती. पाकिस्तानने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असताना भारताच्या स्नेह राणा आणि पुजा वस्त्रकर यांनी शतकी भागिदारी करून आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. भारताने दिलेल्या 245 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात संथ झाली. त्यांनी 10 षटकात फक्त 26 धावा केल्या होत्या. पण त्यांनी एकही विकेट गमावली नव्हती. 11व्या षटकात राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तिने जवेरिया खानला 11 धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर फार वेळ टीकले नाहीत. भारताने सहावी विकेट 33व्या षटकात मिताली राजच्या रुपाने गमावली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारताची विकेट मिळवण्यासाठी 50व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. 50व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुजा बाद झाली. तिने 59 चेंडूत 8 चौकारांसह 67 धावा केल्या. तर स्नेहने 48 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या, यात 4 चौकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात झुलन गोस्वामीने 3 चेंडूत 6 धावांचे योगदान दिले.