उत्तम वेव्हारे जोडोनिया धन, उदास विचारे वेचकरी, ही तुकोबा माऊलींची शिकवण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णपणे भिनवून घेतली आहे. या अभंग ओळीतील उदासीचा अर्थ विरक्त असा घ्यावा. अशा जणू विरक्तीनेच रामशेठ यांनी अक्षरश: हजारो कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडले. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात तर कित्येक गरजूंसाठी ते देवदूत बनून उभे राहिले आहेत. समाजाला आधारभूत वाटावीत अशी रामशेठ यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे नेहमी घडत नाहीत.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या गाजलेल्या कवितेतील ओळी आठवल्या की पाठोपाठ लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते किंवा अनेकदा उलटदेखील घडते. याही वयात जनसामान्यांसाठी त्यांना राबताना पाहिले की कविवर्य बोरकर यांच्या वरील ओळी आठवतात. आपले संपूर्ण जीवन लोकशिक्षण आणि लोकसेवेसाठी वाहिलेल्या माननीय रामशेठ यांचा महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी हृद्य सत्कार करण्यात आला हे उचितच झाले. त्यांच्यासह सेवाभावी तरुण डॉक्टर अमेय देसाई, समाजसेवक डॉ. जगन्नाथ हेगडे यांचा आणि अन्य काही मान्यवरांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. वास्तविक असे सत्कार समारंभ आणि हारतुर्यांची अपेक्षा रामशेठ यांनी कधीच ठेवली नाही. सतत कार्यरत असलेल्या या लोकनेत्याला हजार हात असावेत असेच त्यांना ओळखणार्यांना वाटत आले आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे की जी भल्याभल्यांची झोप तरी उडवते किंवा मस्तकात तरी जाते. हाताशी असलेला पैसा सढळ हाताने गरजूंसाठी खर्च करण्याचे जणू व्रतच रामशेठ यांनी घेतले आहे. तसे पाहता या अफाट मुंबापुरीत किंवा महाराष्ट्रात श्रीमंत माणसे काही कमी नाहीत, परंतु दातृत्वाचे हात असणारे श्रीमंत विरळच म्हणावे लागतील. स्वत: रामशेठ हे काही सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्मास आले नव्हते. परिस्थितीचे टक्केटोणपे खात, खडतर परिस्थितीवर मात करत रामशेठ यांनी स्वत:ची कारकीर्द घडवली, पण त्याचबरोबर हजारो लोकांना मदतीचा हातही दिला. स्वत: रामशेठ हे मूलत: पेशाने शिक्षक. शिक्षकी पेशामधूनच त्यांनी समाजसेवेचा मार्ग आखून त्यावर पदक्रमणा सुरू केली. त्यांचा मार्ग त्यांनी स्वत:च तयार केला होता. त्यांच्या पायाखालील वाटेचा पुढे महामार्ग झाला. त्या महामार्गावरून आज हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चालत आहेत, आपापले भविष्य घडवत आहेत. रामशेठ यांच्या रूपाने पनवेलच्या पंचक्रोशीतील गोरगरिबांना जणू वाली मिळाला हे पनवेलकरांचे परमभाग्य आहे. रामशेठ यांनी स्थापन केलेल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये देणगी अथवा कॅपिटेशन फी कधीही घेतली जात नाही. उलटपक्षी गरीब विद्यार्थ्यांचे शुल्क कमी अथवा माफ करण्याकडेच कल असतो. यावरूनच शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. राजभवनावर झालेल्या सत्काराला उत्तर देताना रामशेठ यांनी अत्यंत नम्रपणे तुकोबा माऊलींचाच एक अभंग सांगितला. फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भार वाही… त्यांच्या या उद्गारावरूनच समाजसेवेबद्दल त्यांना नेमके काय वाटते ते स्पष्ट होते. आयुष्याचा प्रत्येक क्षण गोरगरिबांसाठी आणि गरजूंसाठी वेचणार्या रामशेठ यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच जगनियंत्यापुढे प्रार्थना.