कर्जत : बातमीदार
मानवी जीवनात चांगले काम करून किर्तीरूप उरावे. दुसर्याचे दोष दाखवून देण्यापेक्षा आपण किती गुणी आहोत, याचा विचार आधी करावा असे आवाहन हभप उत्तम महाराज बढे यांनी कोलीवली (ता. कर्जत) येथे केले.
श्री संत वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने नेरळजवळील कोलीवली गावात अडीच दिवसांचा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात हरिकीर्तन, भजन, जागर भजन, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मिरचोली येथील श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाने दररोज काकडा, भजन सादर केले. हभप हरिभाऊ महाराज पारधी आणि राजेंद्र महाराज जाधव यांनी किर्तन तर हभप ओंकार कराळे, हभप मधुकर महाराज कराळे यांनी प्रवचने सादर केली. श्री संतसेवा वारकरी संप्रदाय मंडळ आणि श्री संतसेवा वारकरी संप्रदाय मंडळ यांनी सामुदायिक हरिपाठ सादर केले. दीपोत्सव कार्यक्रमाला कर्जत तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. काल्याचे किर्तन देवाची आळंदी येथील हभप उत्तम महाराज बढे यांनी केले. देवाची आळंदीमध्ये प्रत्येक संप्रदायाने धर्मशाळा बांधाव्यात आणि तेथून सर्वांनी हरिनाम मुखी घ्यावे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष हभप दिगंबर तांबोळी, कार्याध्यक्ष हभप विजय महाराज पाटील, सचिव हभप ज्ञानेश्वर तांबोळी आणि खजिनदार शरद धुळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.