मुंबई ः प्रतिनिधी
अँटिलिया स्फोटके प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता सचिन वाझेचा साथीदार असलेल्या पोलीस अधिकारी रियाझ काझी याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. गेल्याच महिन्यात रियाझ काझीला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. कटात सामील असल्याचा तसेच पुरावे नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा काझीवर आरोप आहे. अँटिलियाबाहेरील स्फोटके प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून रियाझ काझी विक्रोळीत गाड्यांच्या नंबर प्लेट बनवण्यार्या दुकानात गेला होता. काझी दुकानात जाताना सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाला, हे मात्र त्याच्या लक्षात आले नाही. त्याला फक्त दुकानातील सीसीटीव्ही आणि फुटेज ताब्यात हवे होते. दुकानात गेल्यानंतर त्याने मालकाशी संवाद साधला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानातील डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर व संगणक सोबत घेऊन गेला. त्याचबरोबर वाझेच्या शेजार्याकडील सीसीटीव्ही फुटेजही घेऊन गेला होता.
16 एप्रिलपर्यंत कोठडी
एनआयएने यापूर्वीही रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवले होते, मात्र त्या वेळेस त्याने एनआयएच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. रविवारी पुन्हा एकदा चौकशीला बोलवल्यानंतर एनआयएने अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, 16 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली. वाझे याच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझीची ओळख आहे. दरम्यान, वाझेच्या सोबत कार्यरत असलेले प्रकाश ओव्हाळ यांचीही एनआयए चौकशी करीत आहे.