कर्जत : बातमीदार
तालुक्यातील मेचकरवाडी येथे घरी जाण्यासाठी निघालेल्या एकास कशेळे – कोठिंबे रोडवर काही जणांनी गाठून बेदम मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता तू आमची गाडी का पाडली, असे म्हणून अजून मारहाण केल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. सदर प्रकरणाबाबत पीडित व्यक्तीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
भरत शिद हे मूळचे मेचकरवाडी आंबिवली येथील मात्र सध्या ते कशेळे येथे आपल्या परिवारासोबत राहतात. शेती करून ते परिवाराचा चरितार्थ चालवतात. तसेच सामाजिक क्षेत्रातही ते काम करतात. 28 मार्च रोजी ते कशेळे येथून आपल्या घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले असताना संभाजी कोकणे यांच्या घराजवळ तानाजी बोराडे (रा. हेदवली, ता. कर्जत) याने आपल्या साथिदारांसोबत दुचाकीवर पाठीमागून येऊन शिद यांची दुचाकी पाडण्याचा प्रयत्न केला. दुसर्या दुचाकीवर बोराडे यांच्या साथिदारांनी दुचाकी आडवी टाकत शिद यांचा रस्ता अडवला. आणि सरळ शिद यांना शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बावरून शिद यांनी मला का मारता, असे विचारले. त्यावर आमची दुचाकी का पाडली, असे म्हणत त्यांनी शिद यांना परत मारण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणार्या लोकांनी शिद यांना होणारी मारहाण थांबवली, त्यानंतर बोराडे आणि त्याचे साथीदार तिथून निघून गेले. मारहाणीने भेदरलेले शिद तसेच घरी गेले आणि दुसर्या दिवशी त्यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकारची फिर्याद नोंदविली. त्यावरुन तानाजी बोराडे व त्याच्या दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.
दरम्यान, भरत शिद हे राजे प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे आदिवासी विभाग कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून काम आहेत. त्यांच्यावरील या हल्ल्याचा प्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त केला जात असून आरोपींना लवकरातलवकर अटक करा, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकार्यांना देण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे यांनी सांगितले.