Breaking News

महाआघाडीचा नेता कोण? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सवाल

अहमदाबाद : वृत्तसंस्था

एनडीएविरोधात महाआघाडी करणार्‍या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. पंतप्रधानपदासाठी आमचा नेता एक आहे. विरोधकांनी त्यांचा नेता कोण ते एकदा सांगावे, असे ठाकरे म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी (दि. 30) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आयोजित सभेत ठाकरे यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांनी त्यांची एक रॅली काढून दाखवावी आणि त्या वेळी तिथे जमलेल्यांना एका व्यक्तीच्या नावाने घोषणा द्यायला सांगाव्यात. महाआघाडीतील पक्षांच्या, नेत्यांच्या विचारांत साम्य नाही. कायम एकमेकांचे पाय खेचणारे नेते आज एकत्र आले आहेत. त्या सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मागील चार वर्षांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यावरदेखील त्यांनी भाष्य केले. आज मी येथे आल्याचे पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज माझ्याकडे आणि अमित भाईंकडे आहे. आमच्यातील भांडणे पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो, पण आता आमच्यातील वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले की, आम्हाला खुर्चीची ओढ नाही. 25 वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. भगवा घेऊन आम्ही वाटचाल केली. त्या वेळी सोबतीला अन्य कोणीच नव्हते. दिल्लीवर भगवा फडकावण्याचे आमचे स्वप्न होते. ते 25 वर्षांनी पूर्ण झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच आपला देश सुरक्षित राहू शकतो, असे म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास अमित शहा यांनी या वेळी व्यक्त केला.

– जोरदार शक्तिप्रदर्शन

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी एनडीएतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंग, वित्तमंत्री अरुण जेटली, परिवहन मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, राष्ट्रील लोकशाही दलाचे रामविलास पासवान आदींचा समावेश होता.

देशासमोर आज प्रश्न आहे की देशाला सुरक्षा कोण देऊ शकतो. देशाला सुरक्षा एकच व्यक्ती, एकच पक्ष देऊ शकतो ते म्हणजे नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएचे सरकार. 70 वर्षे देश ज्या नेतृत्वाची वाट पाहत होता, ते नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपात मिळाले आहे.
-अमित शहा,  भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply