नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्हाणी, अडचणींबाबत अर्ज, निवेदने स्वीकारणार आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रकामधील नमूद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर म्हणजेच 23 ऑगस्टपर्यंत या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गार्हाणे ऐकण्यात येईल. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व-अपिल्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. लोकशाही दिवशी विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जावर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी, असे उपायुक्त (सामान्य) कोकण विभाग यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.