Breaking News

कर्जत रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत हे मुंबई व पुण्याच्या अगदी मधोमध असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र कोविड काळात बंद केलेल्या गाड्या तसेच बंद केलेले थांबे आणि अन्य समस्या सोडविण्याबाबत कर्जत भाजप तर्फे शुक्रवारी (दि. 3) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबई-लातूर ही गाडी पकडण्यासाठी शुक्रवारी पनवेल मार्गे कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांच्या सोबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर होते. स्थानकावरील स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयात ते थांबले होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी कर्जतकरांच्या वतीने पंकज ओसवाल यांनी फडणवीस यांना समस्यांचे निवेदन सादर केले. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसान मोर्चाचे कोकण समन्वयक सुनील गोगटे, भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बेहेरे,  तालुका उपाध्यक्ष शर्वरी कांबळे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, दिनेश सोळंकी आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी रेल्वेच्या समस्यांबाबत पंकज ओसवाल यांनी चर्चा केली. कोरोनाचे सावट असल्यामुळे काही निर्णय तात्कळ घेता येत नाहीत मात्र लवकरच मार्ग निघेल, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.

कर्जत येथे अधिकृत थांबा द्यावा

चेन्नई मेल, कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस या गाड्या (पूर्वी मुंबई येथून सुटत होत्या त्या सध्या पुण्याहून सोडण्यात येत आहेत) पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोडण्यात याव्यात), गदक एक्सप्रेस, सिकंदराबाद एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस,  हैदराबाद एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस या गाड्यांना कर्जत येथे अधिकृत थांबा द्यावा, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस, जोधपूर-बंगलोर एक्सप्रेस या गाड्यांना पूर्ववत थांबा द्यावा. तसेच पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पनवेल-पुणे-बारामती शटल, पुणे-इंदोर एक्सप्रेस या गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात. कोरोनापूर्वी जी सवलत ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होती ती पुन्हा त्वरित सुरू करावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply