विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर -ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसर्या वन-डे सामन्यात 387 धावांचा डोंगर उभा केला. रोहितेने 159, तर राहुलने 102 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतके झळकावित पाहुण्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली.
यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. मग रोहित शर्मा शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत फटकेबाजी करीत भारताची बाजू अधिक भक्कम केली. पंत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात 39 धावांवर माघारी परतला. दुसरीकडे अय्यरने फटकेबाजी करीत आपले अर्धशतक पूर्ण केले. 49व्या षटकात अय्यर 53 धावा काढून माघारी परतला. विंडीजकडून शेल्डन कोट्रेलने दोनन, तर अल्झारी जोसेफ, किमो पॉल आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
-रोहितने केली दिग्गजांशी बरोबरी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने वनडेमधील 28वे शतक झळकावले. 2019मधील रोहितचे हे सातवे शतक ठरले. एका वर्षात सर्वाधिक शतक करण्यात रोहितने डेव्हिड वॉर्नर आणि सौरव गांगुली यांच्याशी बरोबरी केली. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्याने 1998मध्ये एका वर्षात नऊ शतके केली होती.