पनवेल एमकेसीएलचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) पनवेलच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘भरारी 2025’ हे करिअरविषयक मोफत मार्गदर्शन शिबिर मंगळवारी (दि. 10) पनवेल येथे आयोजित करण्यात आले.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, पुणे एमकेसीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक नटराज कटकधोंड, स्वाती जयंत भगत, एमएसआयसीटीचे विविध विभागातील अधिकृत केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःच्या संघर्षमय कारकिर्दीची गाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यांनी आपले करिअर कसे घडवले याबद्दलची माहिती देत विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, लेखक व व्याख्याते प्रा. विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक युगात केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादा न राहता नवीन क्षेत्रांमध्येही भरपूर संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी उदाहरणांसह समजावून सांगितले. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन, आर्ट्स, कॉमर्स, लॉ, डिझाईन, मीडिया, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि बाजारातील गरज यांचा समतोल साधून करिअरची दिशा निवडावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन पनवेलमधील एमएस-सीआयटी केंद्रांनी केले. शिबिराच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि भविष्यात असे उपक्रम अधिक प्रमाणात आयोजित करण्याची मागणी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper