कोरोना महामारीचे या घटकेला दिसणारे चित्र मोठ्या विचित्र मन:स्थितीत ढकलणारे आहे. एकीकडे कोरोनाचा आपल्या देशातील रुग्णआलेख उतरणीला लागलेला दिसत असल्याने हायसे वाटते आहे. तर त्याचवेळी युरोप अमेरिकेत दिसणार्या कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेमुळे छाती पुन्हा दडपून जाते आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आदी अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाचे विक्रमी आकडे समोर येऊ लागले असून तिथे नव्याने कठोर निर्बंध लादण्याची तयारी सुरू झाली आहे.
गेला जवळपास आठवडाभर आपल्याकडे कोरोना महामारीच्या संदर्भात सातत्याने दिलासादायक बातम्या झळकताना दिसल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येचा घसरता आलेख, कोरोना बळींमध्ये दिसणारी मोठी घट यामुळे सणासुदीच्या दिवसांत लोकांचा उत्साह आणखीनच उधाणला आहे. महाराष्ट्रातही प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच रुग्णसंख्या घटू लागली आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे तीन हजार 634 रुग्ण नोंदले गेले. जूनअखेरनंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णवाढ आहे. सोमवारी राज्यात नोंदला गेलेला कोरोना बळींचा आकडाही 84 इतका होता. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत हा आकडाही बराच कमी आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत महिलांकरिता उपनगरी रेल्वेप्रवास खुला झाला, मेट्रो सेवा सुरू झाली. सणासुदीच्या हंगामामुळे रस्तोरस्ती पूर्ववत गर्दी दिसू लागली. परंतु, लोकांमध्ये एकंदरीत बेफिकीरी वाढते आहे अशी चिंताही सोबतच मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागली आणि ती खरीही आहेच. युरोप-अमेरिकेतील सध्याचे चित्र पाहिले तर ही चिंता किती वास्तव आहे हे समजते. उत्तर गोलार्धातील अनेक देशांना सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट नव्याने घेरताना दिसते आहे. एकंदरीत जागतिक आर्थिक चित्रावर या दुसर्या लाटेची गडद छाया सोमवारपासून दिसू लागली आहे. अमेरिकी शेअरबाजारावर सोमवारी याचा मोठा परिणाम दिसून आला. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनाप्रतिबंधक लस तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांमध्येही कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी होताना दिसते आहे हाच तेवढा भविष्यातील परिस्थितीबाबतचा सध्याचा दिलासा. युरोप-अमेरिकेत कडाक्याच्या थंडीच्या दिवसांची चाहूल लागू लागली असून या काळात लोक मोठ्या संख्येने चार भिंतींआडच एकमेकांच्या संपर्कात येणार असल्यामुळे संसर्गाची भीती अधिक आहे. ऑक्सफर्डची लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असण्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी आताच ही लस तयार झाली असे म्हणता येणार नाही असे ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे याकडेही लक्ष द्यायला हवे. लस बाजारात उपलब्ध व्हायला 2021 साल उजाडणार असे त्यांनी म्हटले आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात तर प्रत्येकापर्यंत लस पोहचायला आणखी किमान दोन वर्षे लागतील असे तज्ज्ञ डॉक्टरमंडळी सुरूवातीपासून म्हणत आहेत. लहान मुलांमार्फत कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ शकतो असे प्रतिपादन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून मंगळवारीच करण्यात आले. आपल्याकडे अनेकांना याबाबत काहीच कल्पना नसल्याप्रमाणे त्यांचे एकंदर बेफिकीर वर्तन असते. देशभरातील एकूण रुग्णसंख्येमध्ये अवघी आठ टक्के इतकी मुले दिसतात. परंतु कोणतीही लक्षणे दिसत नसताना मुले घरातील अन्य व्यक्तींमध्ये संसर्ग मात्र पोहचवू शकतात याचे भान राखायलाच हवे. त्यांनाही सर्व दक्षता पाळण्यास म्हणूनच शिकवले पाहिजे. लहानग्यांनीच काय, कोरोनाच्या आलेखात सध्या कितीही घसरण दिसत असली तरी आपण सगळ्यांनीच येत्या काळात कमालीचे दक्ष राहणे तितकेच गरजेचे आहे.