Breaking News

राज्यात कोरोनाचा नवीन स्टेन नाही

आरोग्य विभागाचा निर्वाळा

पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या आढळून येणारा कोरोना विषाणू हा नवीन प्रकार (स्टेन) नाही. आतापर्यंत आढळत असलेलाच हा विषाणू आहे, असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे, तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचे परदेशी स्टेन आढळून आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यावर आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.
राज्यात सध्या आढळणार्‍या विषाणूंचा प्रकार हा ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमधून आला आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात जनुकीय विश्लेषण करण्यात आले. या तपासणी अहवालानुसार राज्यात नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.
या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेकडे जनुकीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply