Breaking News

शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी -भाजप नेत्या शर्मिला सत्वे

माणगाव : प्रतिनिधी

परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांच्याकडे दिले आहे. शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी  नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांची भेट घेऊन  शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा केली. या वेळी चर्चा करताना भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी सांगितले की, कोरोना, निसर्ग चक्रीवादळ व परतीचा पाऊस अशा तिहेरी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याला त्वरित मदत देण्याची गरज आहे. निसर्ग चक्रीवादळ होऊन येत्या 3 नोव्हेंबरला चार महिने पूर्ण होतील. तरीही नुकसानभरपाई मिळाली नाही. या शेतकर्‍यांना उभारी देऊन त्यांच्यावर आलेले संकट राज्य सरकारने दूर करावे, अन्यथा तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शर्मिला सत्वे यांनी दिला. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण, चिटणीस संजय  जाधव, निळज ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम आदी उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply