Breaking News

रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार.

रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल क्षेत्रामधील 2006मध्ये ठेवलेल्या पावलाचा ग्राहकाभिमुखी साक्षात्कार असून सध्या हाच किरकोळ ग्राहकांशी निगडित असलेल्या व्यवसायांचा केंद्रबिंदू आहे. 2006मध्ये आरंभ झाल्यापासून रिलायन्स रिटेलने लाखो ग्राहक आणि हजारो शेतकरी व विक्रेते जोडले आहेत. रिलायन्स रिटेल दर तासाला 10,00,000पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देते आणि त्यास 117 दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत ग्राहकांचा आधार आहे. रिलायन्स रिटेलने बहु-प्रांज्य रणनीती अवलंबली आहे आणि आजूबाजूची दुकाने, स्टोअर्स, सुपर मार्केट्स, हायपर मार्केट्स, घाऊक रोख व विशिष्ट स्टोअर्स आणि ऑनलाइन स्टोअर्स चालवत आहेत आणि सर्व भारतीय ग्राहकांसाठी सर्व विभागातील उत्पादने व सेवा यांच्यामध्ये उदात्तीकरण केले आहे.

रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स मार्केट, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स रेस्क्यू, रिलायन्स ज्वेल्स, ट्रेंड्स, ट्रेंड्स वूमन, ट्रेंड्स मॅन, ट्रेंड्स जुनिअर, ट्रेंड्स फूटवेअर, आजियो हे ऑनलाइन पोर्टल, प्रोजेक्ट इव्ह असे रिलायन्सचे स्वतःचे ब्रँड असून आजघडीला रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वांत मोठी रिटेल श्रेणी आहे. नुकतेच कंपनीने फ्युचर रिटेलचेदेखील अधिग्रहण केले असून बदलत्या काळातील बदलती लाइफ स्टाइल ओळखून रिलायन्सने ऍपेक्स, बॅली, ह्युगो बॉस, बोट्टेगा वेनेता, ब्रूक्स ब्रदर्स, बर्बरी, कॅनाली, हँडबॅग्ससाठी प्रसिद्ध कोच हा ब्रँड, अमेरिकन स्पोर्ट्सवेअर डीसी, डिझेल, इंग्लंडचा प्रसिद्ध ड्यून, एम्पोरिओ अरमानी, एरमेनेजिल्डो झेंगन्या, फ्लोमार हा कॉस्मेटिक ब्रँड, जॉर्जो अरमानी, मागच्याच वर्षी भागीदारी केलेला इंग्लंडचा हेमलीज हा खेळणी बनवणार्‍या कंपनीचा ब्रँड, हंकमोलर हा लाँजरी ब्रँड, आयकॉनीक्स, लेडीज पादत्राणांसाठी जिमी च्यू, तर लेडीजसाठी अमेरिकन केट स्पेड, कर्ट ग्यागर, मार्क्स अँड स्पेन्सर, मायकेल कोर्स, मदरकेअर, मुजी हा जपानी लाइफ स्टाइल ब्रँड, पॉल अँड शार्क, पॉल स्मिथ, पेलेस, पॉटरी बार्न, इटालियन फेर्रागामो सलवतोरे, सात्या पॉल, लोकांच्या आवडीप्रमाणे पारंपरिक उंची कपडे बनवून देणारा युरोपिअन ’स्कॉच अँड सोडा’ हा ब्रँड, स्टीव्ह मॅडन, सुपरड्राय, त्चयुमी, ज्वेलरीसाठी अमेरिकन टिफनी अँड कंपनी हा ब्रँड, विलरॉय अँड बॉक, व्हिजन एक्स्प्रेस, वेस्टल्म, वोमो बुलफ्रॉग, तसेच जीन्ससाठी अरमानी एक्स्चेंज, इटालियन ’गॅस’, जीस्टार रॉ, रिप्ले इ. ब्रँड्सबरोबर भागीदारी करून अवघे फॅशनचे जगच समोर आणून ठेवले आहे.

आजघडीस रिलायन्स रिटेलची 11300 दुकाने/मॉल्स असून 26 दशलक्ष स्क्वे. फूट जागा ग्राहकांच्या सेवेत आहे. याखेरीज रिलायन्समार्फत त्यांच्या मॉल्समध्ये जागतिक दर्जाच्या विविध ब्रॅण्ड्सचा समावेश पाहायला मिळतो, जसे की परंपरागत भरजरी वस्त्रांसाठी अवासा हा ब्रँड, डेनिमसाठी डीएनएमक्स, पुरुषांच्या शर्ट्ससाठी जॉन प्लेयर्स व कॅज्युअल्ससाठी नेटप्लाय, स्पोर्ट्स व फिटनेससाठी परफॉरमॅक्स हा ब्रँड, लहान मुलांसाठी तयार कपड्यांचा खास पॉइंट कोव्ह हा ब्रँड, कॅज्युअल्ससाठी टीम स्पिरिट, मोबाइल हँडसेट्ससाठी ’लाइफ स्मार्टफोन्स’ ब्रँड, संपूर्ण किराणा मालासाठी गुड लाइफ म्हणून विकसित केलेला ब्रँड, स्नॅक टॅक ब्रँड अंतर्गत कधीही भुकेच्या वेळी तोंडात टाकण्यासाठी मिड-स्नॅक्स सोल्यूशन्स म्हणून विविध पदार्थ, एन्झो मॅटिक नावाने डिटर्जंट्स, पौष्टिक न्याहारीसाठी हेल्दी लाइफ ब्रँड अंतर्गत उत्पादने, आरंभ नावाने विविध चहाचे प्रकार अशा प्रकारे संपूर्ण रिटेल क्षेत्रातील थाट मांडला गेलेला दिसतो.

रिलायन्स जिओ

नुसतेच जिओ म्हणजे मोबाइल सेवा पुरवठादार नसून त्याद्वारे जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन म्युझिक, जिओ न्यूज, जिओ क्लाऊड सर्व्हिसेस, जिओ मनी, जिओ गेम्स, जिओ असिस्टंट, जिओ वायफाय, जिओ हेल्थ डिजिटल हब, जिओ फायबर आणि त्याहून बरेच असे हे जिओचे आधुनिक जग आहे. जे जगातील सर्वांत मोठ्या कॉम्प्युटर प्रणाली उत्पादकांना म्हणजेच मायक्रोसॉफ्टवाल्यांना सुचले नाही ते आज एका भारतीय व्यक्तीने अक्षरशः आपल्या हातात आणून दिले आहे. अब ’कर लो दुनिया मुठ्ठी में!’

मागील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऐलान केल्याप्रमाणे रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्ममधील 24.7 टक्के भागभांडवल विक्रीद्वारे 22.3 बिलियन्स डॉलर्सचा निधी उभारला आणि पाठोपाठ राइट्स इश्यूद्वारे भांडवल उभारून आता कंपनी तत्त्वतः कर्जमुक्त झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या वाढत्या टेलिकॉम आर्म जिओ आणि रिटेल बिझनेसची प्राथमिक समभाग विक्री करू शकेल आणि जी भागधारकांसाठी अतिरिक्त मूल्यवर्धित गोष्ट असेल. याव्यतिरिक्त गेल्या सहा महिन्यांत रिलायन्स कंपनीमध्ये गुंतवणुकीसाठी अक्षरशः धडाका लागलेला पाहायला मिळत आहे. आज रिलायन्स रिटेल या शेअर बाजारात नोंदणी न झालेल्या कंपनीचा बाजारभाव 1400 रुपये प्रतिशेअर असून रिलायन्स जिओला मिळत असलेला प्रतिसाद आणि त्यांचा धडाका पाहता त्यांचा आयपीओ काय भावात येईल हे वर्तवता येत नसेल तरी आजच्या रिलायन्सच्या (2054) भाव-किमतीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे पेट्रोकेमिकल, रिलायन्स रिटेल व रिलायन्स जिओ या तिन्ही कंपन्यांचे मूल्य दडलेले आहे. थोडासा हटके विचार केल्यास आजच्या

भाव-किमतीमधून रिलायन्स रिटेलचा 1400 रु. भाव वगळल्यास उरलेल्या 654 रुपयांत रिलायन्स ग्रुप व रिलायन्स जिओ यांचे मूल्यांकन गृहीत आहे. विचार करा की पुढील 10 वर्षांत ही कंपनी कोठे पोहचेल? अर्थातच तिच्यावर विश्वास ठेवणार्‍यांनादेखील बरोबर घेऊनच. बघा पटतंय का.

सुपर शेअर : कोटक महिंद्रा बँक

मागील आठवड्यात आलेल्या बातमीने कोटक बँकेच्या शेअर्सच्या भावास चांगलीच उभारी दिली. कोटक महिंद्रा बँकेने हिंदुजा समूहाचा भाग असलेली इंडसइंड बँकेचा संभाव्य ताबा घेतल्यास जगातील सर्वांत वाईट कर्जाच्या समस्येवर देश झगडत असताना अशा वेळी मालमत्तांद्वारे भारताची आठव्या क्रमांकाची कर्जवाटपदार बँक तयार होईल. आशियातील सर्वांत श्रीमंत बँकर उदय कोटक यांच्या पाठिंब्याने कोटक महिंद्रा देशातील सर्वांत मोठा बँकिंग करार कोणता असू शकतो आणि हा व्यवहार साधारणपणे 950 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचेल अशी अटकळ आहे. कोटक बँक भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी बँक म्हणून स्थान मिळवू शकेल. या सर्व चर्चा आणि अटकळीमुळे कोटक बँकेचा शेअर आठवड्यात सुमारे 12 टक्के वाढला आणि या आठवड्याचा निफ्टी 50 शेअर्समधून सुपर शेअर ठरला.

-प्रसाद ल. भावे

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply