धान्य, पाण्याची व्यवस्था
जांभूळपाडा : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवनसृष्टीलाच बसत आहे. तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणिमात्रांच्या जीवनावर बेतत आहे, मात्र पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या आवारात पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पक्ष्यांसाठी झाडावर घरटीही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे.
गेल्या काही वर्षापासून झालेल्या जनजागृतीमुळे अनेक लोक स्वतःहून पुढे येऊन पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत. पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी तहानलेल्या पक्षांना दाणापाणी पुरवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात व्यवस्था केली आहे, तसेच पक्ष्यांसाठी झाडांवर घरटीही उभारून, त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे पाली शहरात आता चिमण्या पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.