नवी मुंबई ः बातमीदार
कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व रिक्षा कित्येक महिने बंद होत्या. परिणामी रिक्षाचालकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षा मालकाला पासिंग आणि परमीट नूतनीकरण करता आले नाही. अशा रिक्षावाल्यांना पासिंगचा कोटा वाढवून द्यावा तसेच परमीट नूतनीकरण करणार्या रिक्षावाल्यांकडून दंड आकारू नये, अशी विनंती उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील व आरटीओ सहाय्यक अधिकारी नंदकिशोर पाटील यांना ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेकडून करण्यात आली. ती मागणी मान्य करण्यात आली आहे.
या वेळी रिक्षाचालक संघटनेची मते प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी जाणून घेतली. तसेच संघटनेच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिले की, 21 मार्च 2020 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीपर्यंतच्या कोणत्याही रिक्षाचालकाकडून नूतनीकरण दंड आकारण्यात येणार नाही. रिक्षा पासिंगची वेळ वाढवून देण्यात येईल. या निर्णयामुळे हजारो रिक्षाचालकांना दिलासा मिळणार आहे. या वेळी संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष शरद पाटील, शंकर करे, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.