कारवाई करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी – करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणार्या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणार्या दुचाकी काही समाजकंटकडून थेट समुद्रात टाकून देण्याच्या वाढत्या प्रकारामुळे प्रवासी, कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे.
रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करुन उरण येथे येणार्या प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचार्यांचाही समावेश आहे. उरण येथून अलिबाग येथे जाणार्या आणि अलिबाग परिसरातून उरण येथे कामानिमित्ताने येणारे प्रवासी, कामगार वेळ, पैसे वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन येत असतात. बरेच प्रवासी, कामगार अशा दुचाकी करंजा बंदरातील धक्कयावरच पार्क करून ठेऊन जात असतात. मात्र याआधी बंदरावर पार्क करून ठेवण्यात येणार्या दुचाकींतुन पेट्रोलची चोरी करणे, नासधूस करणे आदी प्रकार सातत्याने घडत होते. परंतु आता यापुढे जाऊन काही समाजकंटकांकडून पार्क करून ठेवण्यात येणार्या दुचाकी थेट बंदरातील समुद्रात टाकून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
तीन दिवसांपूर्वी उरण पंचायत समितीचे कर्मचारी तेजस म्हात्रे यांची गाडी समुद्रात टाकली होती. समुद्राच्या ओहोटीमुळे दुचाकी प्रवाशांच्या नजरेत पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याआधीही समाजकंटकांकडून असे प्रकार घडले असल्याचे सांगितले जात आहे. समाजकंटकांच्या अशा गैर कृत्यांमुळे मात्र प्रवासी, कामगारांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणार्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
अशी गैरकृत्य करणार्या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत जातीने लक्ष घालून चौकशी करीत आहे. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून करंजा धक्कयावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली आहे.