विख्यात सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याला अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एखाद्या दुय्यम दर्जाच्या रहस्यपटाने दर रिळामागे नवे वळण घ्यावे तसा काहीसा प्रकार या एकंदरित प्रकरणाबद्दल सुरू आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमे हे प्रकरण तापवणार याचा अंदाज आला होताच. त्यात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी उडी घेतली आणि तपासाऐवजी संशयाचे राजकारणच यथेच्छ प्रमाणात सुरू झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी थेट ज्येष्ठ तपास अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. वानखेडे हे अतिशय तल्लख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. अमलीपदार्थांशी संबंधित गुन्हेगारांमध्ये त्यांचा चांगलाच वचक आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा फटका अनेक बॉलिवुड सितारे आणि पुढारी यांना यापूर्वीही बसला आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे वानखेडे यांचा कथित जन्मदाखला समाजमाध्यमांवर झळकवून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवातच फर्जीवाड्यातून झाली असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. एक मान्यवर मंत्री कुठलेही औचित्य न राखता बेलगाम आरोप करून सरकारी अधिकार्याच्या चारित्र्यहननापर्यंतची खालची पातळी गाठतो हे चित्र निश्चितच भूषणावह नाही. आर्यन खान प्रकरणाच्या निमित्ताने केंद्रीय तपासयंत्रणांना संशयाच्या धुक्यात गुरफटवून टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खटाटोप काही लपून राहिलेला नाही, परंतु केंद्रीय यंत्रणांच्या तपासकामात अडथळे निर्माण करून महाविकास आघाडीचे नेते नेमके काय साधत आहेत, याचा अंदाज सामान्य नागरिकांना लागणे कठीण आहे. आर्यन खानप्रकरणी तब्बल 22 दिवसांनंतर प्रभाकर साईल नावाचा एक पंच माध्यमांसमोर प्रकट झाला आणि त्याने वानखेडे यांच्यावरच 25 कोटींची डील केल्याचा आरोप चिकटवला. हा प्रभाकर साईल नामक पंच अचानक कसा उपटला? 22 दिवस तो काय करीत होता? त्याची विश्वासार्हता काय? असले प्रश्न कुणालाही पडले नाहीत. असल्या हवेतील आरोपांनंतर माध्यमांना तर ऊत आला आणि वानखेडे यांना खुलासे देत दिल्लीपर्यंत फिरावे लागले. तपास यंत्रणांच्या बहुमोल वेळेचा अपव्यय केल्याबद्दल खरे तर काही तरी शिक्षा असायला हवी. अमलीपदार्थविरोधी विभागाविरुद्ध काही शंका अथवा तक्रारी असल्यास न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत, परंतु अशा कायदेशीर मार्गाने न जाता माध्यमांच्या कॅमेर्यांसमोर बेछूट आरोप करण्याचा थिल्लर मार्ग जबाबदार मंत्री पत्करतात हे अतिशय वेदनादायक आहे. अमलीपदार्थांचा तपास राहिला बाजूला, वानखेडे यांची जात आणि धर्म कोणता याची जाहीर चौकशी सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे. ही बाब क्लेशदायक तर आहेच, परंतु भविष्यकाळाचा विचार केल्यास धोकादायकदेखील आहेच. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. आपले काम चोखपणे बजावणार्या वानखेडे यांच्यासारख्या तपास अधिकार्यास कर्तव्यदक्षतेपायी वैयक्तीक मानहानीला सामोरे जावे लागणार असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. केंद्र सरकार तपासयंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच केला आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बदनामीसाठी तपासयंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नेते करीत आहेत. काँग्रेसने अजून या वादात उडी कशी घेतली नाही हे आश्चर्यच आहे. एकंदरित महाराष्ट्रामध्ये संशयाचे धुकेच धुके निर्माण झाले असून यातून कोणाचेच हित साधता येणार नाही.
Check Also
‘नैना’संदर्भात तातडीने बैठक घ्या
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरणाच्या …