कर्जत : बातमीदार
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ-कळंब रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचे काम करणार्या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे बुधवार (दि. 11) पासून बेमुदत उपोषण करणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी नेरळ-कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले आहे. त्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र जेमतेम दीड वर्षातच रस्त्यावर केलेले डांबरीकरण वाहून गेले आहे. नित्कृष्ट कामामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कामात मंजूर असलेले 200 मिटरचे सिमेंट काँक्रीटकरणदेखील संबंधित ठेकेदाराने आजपर्यंत पूर्ण केले नाही. त्यामुळे साई मंदिर-नेरळ रेल्वे फाटक रस्त्यावरील अरुंद भाग वाहनांसाठी त्रासदायक आणि धोकादायक झाला आहे.
या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत आणि रस्त्याचे काम अर्धवट टाकणार्या ठेकेदार कंपनीवर कारावाई केलेली नाही. त्यामुळे अखेर विजय हजारे यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.