अफाट लोकसंख्येच्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर भयावह परिस्थिती ओढवेल अशी भीती जगभरातच अनेकांना वाटत होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाच्या काळात असे काही झपाट्याने आणि खंबीरपणे निर्णय घेतले आहेत की अनेकविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे.
भारतातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास आहे हे तर सर्वज्ञातच आहे. अगदी लॉकडाऊनसारखा लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावरही हा विश्वास यत्किंचितही डळमळलेला नसून उलट मोदीजींचे सरकार कोरोना संकटाच्या विरोधात अतिशय प्रभावी उपाययोजना करत आहे असेच देशातील 93.5 टक्के जनतेला वाटते असे आता एका पाहणीतून समोर आले आहे. देशात कोरोनाची साथ अवतरताच मोदीजींनी तत्परतेने निर्णय घेऊन ठामपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. प्रथम त्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली व देशातील कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आलेले नाही हे लक्षात घेऊन 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन आणखी वाढवला. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी 76.8 टक्के लोकांचा सरकारवर ठाम विश्वास दिसून आला होता, तर एप्रिलच्या 21 तारखेपर्यंत ही संख्या आणखी वाढून थेट 93.5 टक्क्यांवर गेल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात काय होणार याची चिंता होती, परंतु भारतात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यावर काही दिवसांतच जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी मुक्तकंठाने मोदींचे कौतुक करीत मोदी देशातील कोरोना संकटाचे उत्तम नियंत्रण करीत असल्याचे म्हटले होते. इतकेच नव्हे तर कोरोना साथीविरुद्धच्या लढ्यात जगभरातील तमाम नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकप्रियतेचा सर्वोच्च क्रमांक देण्यात आला असल्याचेही अन्य एका सर्वेक्षणात समोर आले आहे. मॉर्निंग कन्सल्ट नामक संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणात जागतिक नेत्यांमध्ये मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे देशवासीयांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुयोग्य पावले तर मोदीजी उचलत आहेतच. खेरीज इतर देशांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे कामही ते तितक्याच सक्षमतेने करीत आहेत. त्यामुळेच या महासाथीविरुद्धच्या लढ्यात मोदींचे नेतृत्व हे जगभरातील नेत्यांमध्ये अव्वल ठरले आहे असे या पाहणीतून पुढे आले. देशातील एका अग्रगण्य वृत्तसंस्थेने केलेल्या माहितीच्या विश्लेषणातूनही भारताने कोरोना संकटाचे योग्य नियंत्रण केल्याचे पुढे आले. कोरोनाची पहिली केस उघडकीस आल्यानंतर 80 दिवसांत काही विशिष्ट देशांमध्ये कोरोनाच्या आणखी किती केसेस उघडकीस आल्या याचे विश्लेषण या संस्थेने केले. यात अमेरिका, युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन हे देश तसेच इराण आणि चीन या देशांच्या तुलनेत भारतात 80 दिवसांनी कमी केसेस आढळल्याचे स्पष्ट झाले. भारतापेक्षा फक्त दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्येच 80 दिवसांच्या काळात कोरोनाचे कमी रुग्ण आढळल्याचे दिसते. भारतातील मोदी सरकारने परिस्थिती उत्तम हाताळल्यामुळेच कोरोना संकट आटोक्यात ठेवणे शक्य झाले. जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले व गोरगरिबांना मदत करण्यासाठी सदोदित पुढे सरसावणारे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनाही मोदीजींना पत्र लिहून त्यांचे कौतुक करावेसे वाटले यातच सारे काही आले.