Breaking News

अर्णब गोस्वामी यांना अटक; भाजपची निदर्शने

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील कावीर येथील इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी (दि. 4) मुंबईतून अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ अलिबाग येथे भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अन्वय नाईक व त्यांच्या आईचा मृतदेह 4 मे 2018 रोजी मूळगावी कावीर येथील घरी आढळला होता. या प्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास थांबला, मात्र अचानक ही केस पुन्हा चर्चेत आली. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी बुधवारी सकाळी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलीस 11 वाजता अलिबागला पोहचले. त्यानंतर गोस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आपणास मारहाण केली. मी जखमी झालो आहे. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी विनंती गोस्वामी यांनी या वेळी केली. त्यामुळे गोस्वामी यांची पोलीस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे अलिबागमध्ये निदर्शने करण्यात आली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार अ‍ॅड. राहुल नार्वेकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैकुंठ पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे आदी यात सहभागी झाले होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा -प्रवीण दरेकर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या इशार्‍यावर नाचते. पत्रकारांना टीका करण्याचा, त्यांचे मत मांडण्याचा अधिकार घटनेेने दिला आहे. सरकारवर टीका करतोय म्हणून एखाद्या पत्रकाराला अटक करणे योग्य नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्ही पत्रकारांसोबत आहोत, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या वेळी म्हणाले.

सरकार सुडाचे राजकारण करतेय -किरीट सोमय्या

अर्णब गोेस्वामी यांना न्यायालयातून बाहेर आणले जात असताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविले. त्यावर बोलताना मी गोस्वामी यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. राज्यात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. सरकार सुडाचे राजकरण करीत आहे, असा आरोप सोमय्या यांनी या वेळी केला.

…ही तर आणीबाणी!

मुंबई : प्रतिनिधी

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने महाराष्ट्र सरकारवर टीका करताना राज्यात आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील चार आरोपींना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. याच दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने ट्विटरवरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला, तर 2018 साली तपास बंद करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. हा पुन्हा आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न आहे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे.

-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्येप्रकरणी जी केस 2018 सालीच बंद झाली होती, ती केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. -चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍यांसोबत असणार्‍या काँग्रेसच्या प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. तुकडे तुकडे गँग असो की पालघरमधील खुनी यांना शरण देणारे कोण आहेत? याचे देश उत्तर मागतोय. काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणारे कुमकुवत सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने घेऊन जात आहे.

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, मात्र स्वत:चा सूड घ्यायचा या राज्य सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. ठाण्यातील परमार बिल्डरची केसही ओपन करावी लागेल. त्या घटनेतील सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नाव आहे त्यानुसार राज्य सरकारला पळता भुई थोडी होईल. -आमदार आशिष शेलार, भाजप नेते

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply