पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीत मांडण्यात येणार होता, पण आयुक्त गणेश देशमुख यांना विधिमंडळात कामासाठी जावे लागल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे बुधवारी (दि. 16) स्थायी समितीच्या सभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सिडको वसाहतीत अनेक सुविधांची गरज आहे. रोज बाजार आणि वाहनतळासाठी सिडकोने जागा असूनही त्या वेळी मोठ्या जागा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. त्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर आक्रमण केले आहे, तर नागरिक रस्त्यावरच गाड्या उभ्या करीत आहेत. याशिवाय महापालिकेत समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठीही खास तरतूद करण्याची मागणी ग्रामीण भागातील नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे त्यांना किती निधी मिळणार याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष आहे.