मोहोपाडा : प्रतिनिधी
शेडुंग येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या तरुणांत उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने ’आरंभ’ या महोत्सवाद्वारे रिफ्रेशमेंट व फ्रेशर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे यांच्यासह कॉलेज युवकांनी धमाल करून कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमावेळी विद्यापीठाच्या मुख्याधिकारी आणि प्रमुख पाहुण्यांद्वारे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गणेश स्तवनाने मनोरंजनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी गजबजलेला संपूर्ण हॉल एकच जल्लोष करत होता. त्यानंतर रॅप साँग, स्टॅन्डअप कॉमेडी, सोलो साँग, फॅशन शो, मिस अॅण्ड मिसेस इंडिया अशा विविध प्रकारचे आयोजकांकडून मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करत विद्यार्थी प्रेक्षकांचे मने जिंकण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मराठी इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे याने मराठी, हिंदी, कोळीगीतांचे सादरीकरण केले. त्याच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी विद्यापीठाचे चेअरमन डॉ. केशव बढाया, सीईओ मुकेश सोनी, व्हाईस चान्सलर ए. के. सिन्हा, रजिस्टार आर. पी. शर्मा, डॉ .सविता अग्रवाल आदींसह छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.